‘तुमच्यासारखी माणसं सरकारच्या ताटाखालचं मांजर’.. राऊतांचा नार्वेकरांवर हल्लाबोल

मुंबई, २८ नोव्हेंबर २०२३: शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात आज पुन्हा सुनावणी होत आहे. या सुनावणीआधीच खासदार संजय राऊत यांनी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. नार्वेकर यांनी काल दिलेल्या एका वक्तव्यावर पलटवार करत मला त्यांना विचारायचं आहे सरकार पाडणं हे तुमचं काम आहे का? आकडा पाहिजे. मग हा आकडा तुम्ही लावू नका. जोपर्यंत तुमच्यासारखी माणसं सरकारच्या ताटाखालचं मांजर बनून त्या खुर्चीवर बसलेली आहे. तोपर्यंत सरकार कसं पडेल? असा सवाल राऊतांनी केला.

राऊत पुढे म्हणाले, बेकायदेशीर सरकार वाचवण्यासाठी विधानसभा अध्यक्ष पदावर त्याच विचारांची व्यक्ती बसलेली आहे. बेकायदेशीर सरकारला संरक्षण देत आहे. स्पीकर म्हणत होते की सरकार पडणार नाही. हे तुमचं काम आहे का? आकडा पाहिजे म्हणता मग हा आकडा तुम्ही लावू नका. जोपर्यंत तुमच्यासारखी माणसं सरकारच्या ताटाखालची मांजर बनून त्या खुर्चीवर बसलेली आहे तोपर्यंत सरकार कसं पडेल असा खोचक सवाल राऊत यांनी नार्वेकरांना केला.

हे सरकार बेकायदेशीर आहे. नार्वेकर यांना कोर्टाने निर्देश दिले आहेत. सांगितले आहे राजकीय भाषा कमी करा. तुम्ही ज्या खुर्चीवरती बसलेले आहात तिथून तुम्ही सरकारची वकिली करू शकत नाही. स्वार्थासाठी त्यांनी अनेक पक्ष बदललेत, त्यांच्यावर काय विश्वास ठेवायचा? असाही सवाल राऊत यांनी केला. जर तिथं कुणी संविधान मानणारी व्यक्ती बसली असती तर आतापर्यंत हे सरकार कोसळलं असतं. सरकार कधी जाणार हे तुम्ही आम्हाला सांगू नका. आम्हाला माहिती आहे हे सरकार कधी जाणार असे राऊत नार्वेकर यांना उद्देशून म्हणाले.

लोकसभा निवडणुकीत आम्हीच जिंकणार

महाराष्ट्रात अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. मात्र, येथील सत्ताधारी तेलंगणात प्रचारात गुंतले आहेत. शेतकरी संतप्त झालेले आहे. पिकांचे नुकसान झाले आहे. तेलंगणामध्ये तुम्हाला कोण विचारतो. तुम्ही या ठिकाणी थांबा, तेलंगणामध्ये तुमच्याशिवाय निवडणुका होणार नाहीत का? भारतीय जनता पक्ष तिथे पराभूत होणारच आहे. अजित पवार यांच्या पक्षात एवढे मोठे राष्ट्रीय नेते आहेत. त्यांनी यावर बोलले पाहिजे. आमच्यात कुठलेही मतभेद नाहीत. आम्ही या लोकसभेत लढणार आहोत. लोकसभा निवडणुकीमध्ये ४८ प्लस जागा आम्ही जिंकणार आहोत असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला.

काय म्हणाले होते नार्वेकर ?

आमदार अपात्रता प्रकरणी नार्वेकर म्हणाले होते की सरकार पडणं किंवा टिकणं हे फक्त सभागृहातल्या बहुमतावर अवलंबून आहे. त्यामुळे कुणीही भविष्यवाणी केली तर त्याकडे लक्ष देणं मला योग्य वाटत नाही. सरकारकडे संख्याबळ असेल तर सरकार टिकतं. ते संख्याबळ फक्त विधानसभेतच मांडता येतं. त्यामुळे विधानसभेत बहुमत नसेल तरच सरकार कोसळू शकतं.