मुख्यमंत्री शिंदेंना शिविगाळ, माजी महापौरास अटक

मुंबई, २९ नोव्हेंबर २०२३: राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभेतून बदनामी व त्यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी ठाकरे गटातील माजी महापौर दत्ता दळवी यांच्यावर भांडुप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना चौकशीकरता बोलवत त्यांना तात्काळ अटकही करण्यात आली आहे. ठाकरे गटातर्फे रविवारी भांडुपमध्ये ईशान्य मुंबईत राहणाऱ्या कोकणवासियांचा जाहीर मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावापुढे राजस्थान प्रचारावेळी लावण्यात आलेल्या ‘हिंदुह्रदयसम्राट’ या उपाधीवरून माजी महापौर दत्ता दळवी यांनी शिवीगाळ केली.

सार्वजनिक सभेत संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीबद्दल अश्लील शिवीगाळ व अपमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी शिवसेना शिंदेगटाचे उपविभागप्रमुख भूषण पालांडे यांनी भांडुप पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती.

त्यानुसार भांडुप पोलिसांनी दत्ता दळवी यांच्या विरोधात भादवी कलम १५३ (अ), १५३ (ब), १५३(अ)(१) सी, २९४, ५०४, ५०५(१)(क) अंतर्गत गुन्हा दाखल केला. मुख्यमंत्र्यांवर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी हा दुसरा गुन्हा दाखल झाला असून या प्रकरणी भांडुप पोलीसांनी दत्ता दळवी यांना अटक केली आहे.

महाविकास आघाडी सरकार असताना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. त्यामध्ये मुख्यमंत्र्यांचा अवामानकारक उच्चार केल्याने राणे यांना पोलिसांनी अटक केली होती. त्यामुळे भाजप आणि ठाकरे गट यामधील संघर्ष खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला होता. आता उद्धव ठाकरे सत्तेतून गेल्यानंतर त्यांच्या व त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या वक्तव्यावरून कायदेशीर कारवाईला महायुती सरकारने सुरुवात केली आहे. त्यामुळे नारायण राणे यांना केलेल्या अटकेचा बदला घेण्याची प्रक्रिया आता सुरू झाली असल्याचे चर्चा सुरू आहे.