नाराज शिवसैनिकांचे नीलम गोऱ्हे यांच्या घरासमोर आंदोलन

पुणे, २६ डिसेंबर २०२५ :“भाजपने सांगितलेलेच ऐकण्याचे काम शिवसेनेचे नेते करत आहेत. शिवसेनेसाठी केवळ १५ जागांची मागणी कशी केली? शिवसेनेला ताकद देत आहात की खच्चीकरण?” असे सवाल उपस्थित करत शिंदे गटातील इच्छुक शिवसैनिकांनी शुक्रवारी शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांच्या मॉडेल कॉलनीतील घरासमोर जोरदार आंदोलन केले.

आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीत भाजप–शिवसेना युती होणार असली, तरी जागावाटपावरून दोन्ही पक्षांमध्ये धुसफूस सुरू आहे. शिवसेनेकडून २५ जागांची मागणी करण्यात आली असताना भाजपकडून केवळ १५ जागा देण्याची तयारी दाखवण्यात आल्याने शिवसेनेतील इच्छुक उमेदवार व कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. याच पार्श्वभूमीवर घोषणाबाजी करत गोऱ्हे यांच्या घरासमोर आंदोलन करण्यात आले.

आंदोलकांनी गोऱ्हे यांच्यावर गंभीर आरोप करत म्हटले की, “गेल्या पाच वर्षांपासून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना डावलले जात आहे. आमचे कामाचे अहवाल दुर्लक्षित केले जात आहेत. ज्या भागात नीलम गोऱ्हे राहतात, त्या भागात आजपर्यंत शिवसेनेचा नगरसेवक निवडून आलेला नाही. शिवसेना वाढू न देण्यामागे जाणीवपूर्वक दुर्लक्ष झाले आहे. तिकीट वाटप कमर्शिअल पद्धतीने करण्याचा डाव आहे का?” असा थेट सवालही उपस्थित करण्यात आला.

तसेच “एकनाथ शिंदे यांचे भाजपकडून खच्चीकरण सुरू असून, ही खदखद आम्हाला फार आधीपासून आहे. ती व्यक्त करण्यासाठी आज आम्ही इथे आलो आहोत,” अशा भावना इच्छुक उमेदवारांनी व्यक्त केल्या. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गोऱ्हे यांच्या घराबाहेर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

दरम्यान, नीलम गोऱ्हे यांनी आरोप फेटाळून लावत सांगितले की, “शिवसैनिकांना चुकीची माहिती मिळाली आहे. भाजपकडे २५ पेक्षा अधिक जागांची मागणी करण्यात आली आहे. उमेदवारीचे तिकीट वाटप कोणत्याही एका व्यक्तीच्या हातात नसून शहरातील कोअर कमिटी संयुक्तपणे निर्णय घेते.”

अपेक्षित जागा न मिळाल्यास पक्षश्रेष्ठींचा आदेश स्वतंत्र लढ्याचा आला, तर तोही पर्याय विचारात घेतला जाईल. आंदोलकांचे म्हणणे ऐकून त्यांची समजूत काढण्यात आली, असेही गोऱ्हे यांनी स्पष्ट केले.