तिघांनी पुण्याला लुटण्याचे काम केले – पृथ्वीराज चव्हाण यांची टीका
पुणे, ८ जानेवारी २०२६ : ‘केंद्रात कमलनाथ नगरविकास मंत्री असताना पुणे मेट्रोला मंजुरी मिळाली आणि मी मुख्यमंत्री असताना माझ्याच हस्ते भूमीपूजन झाले. त्यामुळे भाजपने मेट्रोचे श्रेय घेण्याचा खोटा आव आणू नये,’ असा घणाघाती टोला माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरुवारी लगावला. स्मार्ट सिटी, हायपरलूपसारख्या गाजावाजा केलेल्या योजनांचे पुढे काय झाले, याचे उत्तर भाजपने द्यावे, असे आव्हान देत ‘घोषणा करायला पैसे लागत नाहीत. चुकीच्या योजना राबवून सत्तेतील तिघेही पक्ष पुण्याची लूट करत आहेत,’ असा आरोप त्यांनी केला.
पुणे मेट्रो प्रकल्पाच्या श्रेयावरून सुरू असलेल्या वादात काँग्रेसने आज थेट उडी घेतली. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या ‘पुणेकरांचा अधिकारनामा’ या दस्तऐवजाचे प्रकाशन पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी भाजपवर जोरदार टीका केलीच, शिवाय राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेलाही लक्ष्य केले. यावेळी काँग्रेसचे पश्चिम महाराष्ट्र प्रभारी सतेज पाटील यांच्यासह पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित होते.
चव्हाण म्हणाले की, ‘जेएनएनयुआरएम योजनेच्या माध्यमातून काँग्रेस सरकारने पुणे शहराला मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला. मेट्रो प्रकल्पाची सर्व कागदपत्रे उपलब्ध असून या प्रकल्पासाठी मी स्वतः पाठपुरावा केला. मुंबईनंतर पुण्याला मेट्रो मंजुरी देताना नागपूरला डावलता येणार नाही, म्हणून तेथेही मेट्रो प्रकल्पास मंजुरी देण्यात आली.’
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यासाठी ८० हजार कोटी रुपयांच्या घोषणा केल्याचा उल्लेख करत चव्हाण म्हणाले, ‘घोषणा करायला पैसे लागत नाहीत. स्मार्ट सिटी, हायपरलूपचे काय झाले? एकही प्रकल्प पूर्ण न करता केवळ घोषणाबाजी सुरू आहे. यातून पैसे काढण्याचे आणि जनतेच्या डोळ्यात धूळफेक करण्याचे काम केले जात आहे.’
तीन पक्षांच्या सरकारवर जोरदार टीका करताना चव्हाण म्हणाले, ‘या सरकारकडून पुण्याचे लचके तोडण्याचे काम सुरू आहे. पुण्यात एकही नवी कंपनी येत नाही. भ्रष्टाचार आणि वाहतूक कोंडीमुळे विद्यमान कंपन्याही शहराबाहेर जात आहेत. शहराच्या पायाभूत सुविधा कोलमडल्या असून वाढते प्रदूषण पाहता काही दिवसांत पुण्याची अवस्था दिल्लीसारखी होण्याची भीती आहे. राज्यातील तिन्ही पक्षांचे सरकार भ्रष्टाचारात बुडाले असून कोणाला किती वाटा मिळतो याचाच त्यांना विचार आहे. नियोजनशून्य कारभारामुळे आज पुण्यावर ही वेळ आली आहे.’
राष्ट्रवादीला मत म्हणजे भाजपलाच मत
यावेळी सतेज पाटील म्हणाले, ‘भाजपच्या जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनांचे काय झाले, याचे उत्तर त्यांनी द्यावे. पुण्याच्या विकासात काँग्रेसचा सिंहाचा वाटा आहे. पर्यावरण, पाणी आणि वाहतूक हे प्रश्न काँग्रेस सोडवेल. शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. भाजप आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष पुणेकरांची फसवणूक करत असून त्यांच्यात नुरा कुस्ती सुरू आहे. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्यावर टीका करणे ही भाजप प्रदेशाध्यक्षांची वैचारिक दिवाळखोरी आहे. भाजप आणि राष्ट्रवादी हे एकाच नाण्याच्या दोन बाजू असून राष्ट्रवादीला मत म्हणजे थेट भाजपलाच मत देण्यासारखे आहे.’