सलग दुसऱ्यांदा महाराष्ट्र प्रदेश भाजपचे सरचिटणीस होणारे राजेश पांडे कोण आहेत केंद्रस्थानी

पुणे, ता. २४/०२/२०२६: भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षेत असलेली कार्यकारणी २४ फेब्रुवारी रोजी जाहीर झाली. रवींद्र चव्हाण यांच्या टीममध्ये पश्चिम महाराष्ट्र मधून राजेश पांडे यांना संधी देण्यात आली आहे. बावनकुळे यांच्या कार्यकाळात लोकसभा निवडणुकीवेळी सरचिटणीस बनलेल्या पांडे यांना पुन्हा एकदा संघटनेत जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे रवींद्र चव्हाण यांनी पक्ष निष्ठा, कुशल संघटन कौशल्य यांना प्राधान्य दिले आहे असे दिसते.

भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस असलेले राजेश पांडे ४० वर्षांहून अधिक काळ सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय असून अभ्यासू, मितभाषी, उत्तम संघटक आणि नावीन्यपूर्ण लोकसहभाग उपक्रम राबविणारे अशी पांडे यांची ओळख आहे.

मूळचे जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील रहिवासी असलेले पांडे शिक्षणासाठी पुण्यात आले आणि तेव्हापासून पुणे हीच त्यांची कर्मभूमी ठरली. स्वामी विवेकानंदांच्या विचारांनी प्रेरित होऊन त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) या राष्ट्रीय विद्यार्थी संघटनेतून सार्वजनिक जीवनाची सुरुवात केली. पूर्णवेळ कार्यकर्त्यापासून राज्य व राष्ट्रीय स्तरावरील जबाबदाऱ्या पार पाडत त्यांनी विद्यार्थी चळवळ मजबूत केली. १९९३ साली शैक्षणिक प्रश्नांवर अभाविपने मुंबईत काढलेल्या सुमारे तीन लाख विद्यार्थ्यांच्या ऐतिहासिक राज्यव्यापी मोर्चाचे संयोजन त्यांनी केले होते. हा राज्यातील पहिलाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर निघालेला विद्यार्थी मोर्चा होता. पुढे १९९५ साली त्यांनी आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर मंत्रालयसमोर ठिय्या आंदोलन केले होते. तेव्हा राज्यभरातून पाड्यांवरून, आदिवासी आश्रम शाळांतून १० हजारहुन अधिक विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष संवाद साधून त्यांनी मुंबईत मंत्रालयापर्यंत आंदोलनासाठी संघटित केले होते. तेव्हापासून त्यांच्या नेतृत्व गुणांची चुणूक लक्षात येते.

युवक संघटन क्षेत्रातही त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. भारतीय जनता युवा मोर्चाचे देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे प्रभारी असताना पांडे यांनी सहप्रभारी म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. महानगर सरचिटणीस म्हणूनही त्यांनी संघटन बळकट केले. युवकांमध्ये नेतृत्वगुण आणि राष्ट्रभक्ती जोपासण्यासाठी त्यांनी विविध उपक्रम राबवले असून, नॅशनल युवा को-ऑपरेटिव्ह सोसायटी (NYCS) चे अध्यक्ष म्हणूनही ते सक्रिय आहेत. पुढे २०२३ साली त्यांना महाराष्ट्र प्रदेश पातळीवर सरचिटणीस म्हणून तत्कालीन अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत काम करायची संधी मिळाली. त्यावेळीही लोकसहभागाचे ‘हर घर तिरंगा’ , ‘मेरी माटी, मेरा देश’ यांसारखे उपक्रम त्यांनी यशस्वीरीत्या राबवले.

शैक्षणिक धोरणनिर्मितीत त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. महाराष्ट्रातील तीन प्रमुख विद्यापीठांच्या व्यवस्थापन परिषदांवर सदस्य म्हणून त्यांनी काम केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात त्यांच्या पुढाकाराने राबवलेले उपक्रम गिनीज विश्व विक्रम म्हणून नोंदवले गेले आहेत. त्यात युवासहभाग आणि लोक प्रबोधन केंद्रस्थानी राहिले. शिक्षण, आरोग्य, रोजगार, क्रीडा, सहकार आणि सांस्कृतिक वारसा संवर्धन या क्षेत्रांत त्यांनी शहरी आणि ग्रामीण भागात विविध उपक्रम राबवले आहेत.

पुणे पुस्तक महोत्सवाचे ते संकल्पक आहेत. पुणे शहर युनेस्को ‘जागतिक पुस्तक राजधानी’ व्हावे या संकल्पनेतून सुरू झालेल्या या महोत्सवाने मागील तीन वर्षांत 15 पेक्षा अधिक गिनीज विश्व विक्रम आपल्या नावावर नोंदवले आहेत. साहित्यप्रेम आणि उपक्रमशीलतेची दखल घेत भारत सरकारच्या नॅशनल बुक ट्रस्ट (NBT) ने त्यांची संचालक मंडळावर सदस्य म्हणून नियुक्ती केली. त्यांच्या पुढाकारामुळे NBT चे प्रादेशिक कार्यालय पुण्यात सुरू होत आहे.

भारतीय जनता पक्षात त्यांनी पुणे शहर संघटक, महापालिका निवडणूक प्रभारी, प्रदेश उपाध्यक्ष, विधानसभा व लोकसभा निवडणूक व्यवस्थापक अशा विविध पदांवर काम करताना यशस्वीपणे जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. सध्या ते महाराष्ट्र प्रदेश भाजपाचे सरचिटणीस म्हणून कार्यरत आहेत. भारताच्या G-20 अध्यक्षतेच्या काळात महाराष्ट्राचे संयोजक म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडली. ‘मेरी माटी, मेरा देश’ अभियानाचे राज्य प्रमुख म्हणून नेतृत्व करताना “सेल्फी विथ मेरी माटी” या उपक्रमाची गिनीज विश्व विक्रमामध्ये नोंद झाली. यापैकी बहुतेक सर्व उपक्रमांना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पाठबळ आणि उपस्थिती राहिली. त्यामुळे पांडे यांना फडणवीसांचा विश्वासू म्हणूनही ओळखले जाते.

लेखन आणि वाचनाची आवड जोपासणारे राजेश पांडे हे ‘गिनीजगाथा’ या पुस्तकाचे लेखक आहेत. युवा भारताच्या लोकसहभागातून घडलेल्या गिनीज विश्व विक्रमांचा प्रेरणादायी प्रवास त्यांनी या पुस्तकातून मांडला आहे. पुणे पुस्तक महोत्सव आणि इतर उपक्रमांतून १५ पेक्षा अधिक गिनीज विश्व विक्रमांमध्ये त्यांचे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष योगदान राहिले आहे.

संघटन कौशल्य, वैचारिक स्पष्टता, पक्ष निष्ठा आणि समाजपरिवर्तनाचा दृढ संकल्प या बळावर राजेश पांडे हे आज महाराष्ट्रातील युवाशक्तीसाठी प्रेरणास्थान आणि सामाजिक बांधिलकीचे प्रतीक म्हणून ओळखले जातात. त्यामुळे येत्या काळात रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली राजेश पांडे यांचा कार्यकाळ वेगळे आयाम गाठेल याबद्दल भाजप कार्यकर्त्यांमध्ये विश्वास व्यक्त केला जात आहे.