पुणे: टिळक चौकात राज ठाकरेंची सभा

पुणे, ६ मे २०२४ः मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला आहे. त्यानंतर पुण्यात मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतला होता. त्यानंतर आता स्वतः राज ठाकरे पुण्यात टिळक चौकात १० मे रोजी सायंकाळी पाच वाजता सभा घेणार आहेत. यावेळी ते काय बोलणार याकडे लक्ष लागले आहे. मनसेचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांनी ही माहिती दिली.

पुणे लोकसभा निवडणुकीचा प्रचार शेवटच्या टप्प्यात येत असताना भाजपच्या प्रचारासाठी पुण्यात महायुतीच्या नेत्यांच्या सभांचा धडाका सुरु होणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे स्वतः. पुण्यात सभा घेणार आहे. तर उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या जाहीरनाम्याचे गुरुवारी (ता. ९) प्रकाशन होणार आहे.
भाजपतर्फे पत्रकार परिषदेत प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे यांनी ही माहिती दिली. लोकसभा प्रभारी श्रीनाथ भिमाले आदी उपस्थित होते.

८ मे ते ११ मे या कालावधीत पुण्यातील सहा विधानसभा मतदारसंघात विविध नेत्यांच्या सभा होणार आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या शहरात तीन सभा होणार आहेत. नितीन गडकरी यांची कोथरूडमध्ये सभा घेण्याचे नियोजन सुरु आहे.

शहरातील सहा मतदारसंघात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे नमो संवाद मेळावे’ घेणार आहेत. महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ महिला मेळाव्यात मार्गदर्शन करणार आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघाचे मतदान झाल्यानंतर अजित पवार संपूर्ण पुणे शहरात प्रचार करणार आहेत. या नेत्यांच्या सभा कधी होणार? कुठे होणार? याचे नियोजन सुरु आहे. तसेच गंजपेठेतील महात्मा फुले स्मारक येथे ९ मे रोजी मातंग समाजाचा मेळावा होणार आहे.