संभाजी भिडेंना फाशीची शिक्षा देणार का ? नाना पटोले यांचा भाजपला सवाल

मुंबई, २८ जुलै २०२३: वादग्रस्त विधाने आणि अजब तर्कासाठी ओळखले जाणारे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेचे संस्थापक मनोहर उर्फ ​​संभाजी भिडे पुन्हा एकदा नव्या वादात सापडले. भिडेंनी एका कार्यक्रमात बोलतांना राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल अत्यंत आक्षेपार्ह विधान केलं. त्यांच्या वक्तव्याचे पडसाद राज्याच्या राजकारणातही उमटले. संभाजी भिडेंवर तातडीने कारवाई करा, अशा अनेक प्रतिक्रिया येत आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी भिडेंच्या अटकेची मागणी केली. तर आता प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही संभाजी भिडेंना भाजप फाशी देणार का ? असा सवाल केला आहे.
काँग्रेसच्या नेत्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची यशवंतराव चव्हाण सेंटरवर भेट घेतली. या बैठकीनंतर काँग्रेस नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंना भिडेंनी केलेल्या वक्तव्याविषयी विचारले असता ते म्हणाले, संभाजी भिडे हे भाजपचं पिल्लू आहे. महाराष्ट्रात थोर पुरूषांविषयी हा भिडे काहीही बरळतो. त्याने आतापर्यंत बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, छत्रपती शिवरायांबद्दल अत्यंत घाणेरडी विधानं केली. महापुरूषांविषयी तोंडाला येईल तसं भिडे बोलतो. महापुरूषांविषयी अशी अपमानजनक बोलण्याचा अधिकार कोणाला नाही. मात्र, भाजपप्रणित ईडीचं सरकारं फक्त ऐकून घेतं आहे. हे सरकार भिंडेंच्या पाठीशी असून भिडेला अभय देतं, मात्र, जनता याची नोंद घेते, अशी टीका करत इशारा दिला.
ते म्हणाले, सावित्रीबाई फुलेंविषयी आक्षेपार्ह लेखन केल्याचं मुद्दा विरोधकांनी विधानसभेत उपस्थितीत करत आरोपीच्या मुसक्या बांधा, अशी भूमिका विरोधकांनी घेतली. एखाद्या नेत्याच्या बायकोबदद्ल कुणी आक्षेपार्ह बोललं तर लगेच कारवाई केली जाते. मात्र, सावित्रीबाईंबद्दल बोललं तर काहीच कारवाई होत नाही, हे दुर्दैवी आहे. काल फडणवीसांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. तुमचं मत मुसक्या बांधून फिरवलं पाहिजे, पण, आमचं मत दोषींना फाशी दिली पाहिजे, असे ते म्हणाले. मग आता ते भिडेंना फाशी लावणार का? असा सवाल करत भिडेंच्या बाबतीत सरकार नरमाईची भूमिका घेत आहे असं ते म्हणाले.

भिडे काय म्हणाले?
करमचंद गांधी, ज्यांना महात्मा गांधींचे वडील म्हटले जाते, ते एका मुस्लिम जमीनदाराकडे काम करायचे. त्या जमीनदाराकडून मोठी रक्कम चोरून करमचंद गांधी पळून गेले. त्यामुळं मुस्लिम जमीनदाराने करमचंद गांधींच्या पत्नीचे म्हणजेच महात्मा गांधींच्या आईचे अपहरण करून त्यांना आपल्या घरी आणले. यानंतर जमीनदाराने तिला पत्नीप्रमाणे वागणूक दिली. त्यामुळे करमचंद गांधी हे महात्मा गांधींचे खरे वडील नसून ते त्या मुस्लिम जमीनदाराचे पुत्र आहेत. इतकेच नव्हे तर महात्मा गांधींचे शिक्षण आणि काळजीही याच मुस्लिम जमीनदारानेच केली होती. याचे पुरावे माझ्याकडे आहेत, असे संभाजी भिडे अमरावती येथील सभेत म्हणाले.

दरम्यान, भिडेंच्या या वक्तव्यावरून सरकार आता त्यांच्यावर काय कारवाई करते, हेच पाहणं महत्वाचं आहे.