विधीमंडळात प्रवेशासाठी लाचखोरी दिवसाच्या पाससाठी हजार रुपये! – भाजप नेते प्रवीण दरेकर यांच्या दाव्यामुळे खळबळ

मुंबई, २९ जुलै २०२३ : विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असल्यामुळे विधानभवनातील गर्दीमुळे मंत्री- आमदारांना चालणेही मुश्कील होत आहे मर्जीतल्या लोकांना प्रवेशपास दिला जात असून अधिवेशनात एक दिवस हजर राहता यावे, यासाठी एक हजार रुपयांत तर संपूर्ण अधिवेशनासाठी दहा हजार रुपयांत पास मिळत असल्याचा खळबळजनक दावा भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी केल्याने विधान परिषदेत खळबळ उडाली आहे.

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन १७ जुलैपासून सुरू झाले आहे. त्यामुळे विधान भवनात मंत्री, आमदारांसोबत येणाऱ्या कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी होते. या गर्दीमुळे मंत्र्यांनाही रेटारेटी करत बाहेर पडावे लागत असल्याचा औचित्याचा मुद्दा शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी उपस्थित केला. वाढत्या गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणीही काळे यांनी केली.

स्वच्छतागृहांची स्थिती दयनीय’
विधान परिषद परिसरातील स्वच्छतागृहांची स्थिती दयनीय असल्याचे शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार अॅड. अनिल परब यांनी सांगितले. स्वच्छतागृहात प्रचंड अस्वच्छता असून, नळातून मात्र धो धो पाणी वाहत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. उपसभापती गोऱ्हे यांनी तातडीची
बैठक घेऊन उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात येतील, असे सांगितले.