वसंत मोरे शरद पवारांच्या भेटीला

पुणे, २७ फेब्रुवारी २०२४ ः बारामती लोकसभा मतदारसंघात यावेळी शरद पवारांच्या विरोधात अजित पवार यांचे आव्हान आहे. त्यामुळे शरद पवार यांनी सुप्रिया सुळे यांना निवडणुकीत विजयी करण्यासाठी खटाटोप सुरु केला आहे. यामध्ये आज पवारांनी पुण्यास बैठका घेऊन अनेकांशी संपर्क केला. यामध्ये कात्रज येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते वसंत मोरे यांनी आज अचानक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या घटनेमुळे राजकारणात खळबळ उडाली असून वसंत मोरे यांच्या मनात नेमकं काय चाललंय याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

वसंत मोरे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पुण्यातून लढण्यास इच्छुक आहेत. त्यांनी ही इच्छा अनेकदा बोलूनही दाखवली आहे. परंतु, मनसे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांचंही नाव पुढं आलं आहे. या घडामोडींवर वसंत मोरे यांनी नाराजीही व्यक्त केली होती. त्यानंतर वसंत मोरे यांनी आज थेट शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या भेटीला पोहोचले. या घडामोडीची जोरदार चर्चा पुण्याच्या राजकारणात होत आहे.

वसंत मोरे यांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांची भेट घेतल्यानंतर लेट्सअप मराठी प्रतिनिधीने त्यांच्याशी संवाद साधला. पवार साहेबांच्या भेटीमागचं कारण काय होतंं असे विचारले असता मोरे म्हणाले, माझ्या प्रभागातील नऊ एकर जागेचे आरक्षण आहे. माझ्या प्रभागातील नागरिकांचा विचार करणं फार गरजेचं आहे. हा विषय मी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कानावर घातला होता. सुप्रियाताई सुळे यांच्या बारामती मतदारसंघात ती जागा येते. त्यामुळे सुप्रिया ताईंना पत्र देण्यासाठी मी येथे आलो होतो. महापालिकेतून आता ज्या पद्धतीने दबाव टाकला जात आहे. त्यामुळे हा विषय त्यांना माहिती करून देणं गरजेचं होतं.

मी या ठिकाणी सुप्रिया सुळे यांना भेटण्यासाठी आलो होतो. माझ्या प्रभागातील मैदानाचा प्रश्न प्रलंबित आहे. या प्रश्नासाठी मी आयुक्तांना देखील भेटलो आहे. पण प्रत्येक ठिकाणी भेटल्यानंतर या विषयात काहीतरी गुदमरल्यासारखं वाटत होतं. अधिकाऱ्यांवर कुणीतरी मैदानाचा आरक्षण उठवण्यासाठी दबाव टाकत आहे. अजितदादांनी देखील हा विषय टाळला आहे. यासंदर्भात आमच्या खासदारांसाठी पत्र दोन महिन्यांपासून तयार करून ठेवलं होतं काल रात्री सुप्रियाताईंचा मला फोन आला या ठिकाणी भेटायला या मला माहित नव्हतं या ठिकाणी पवार साहेब देखील आहेत.

माझ्या प्रभागातील नऊ एकरावरील आरक्षणाचा हा प्रश्न आहे यासंदर्भात मी राजसाहेबांच्याही कानावर घातलं आहे. हे मैदान बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये येते त्यामुळे मी सुप्रिया सुळे यांना पत्र दिलं आहे. माझ्या प्रभागात एकदा एकदा एका पोलचे स्टील वाकले होते. त्याचे फोटो मी त्यांना पाठवले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी सुप्रियाताईंनी त्या ठिकाणी भेट दिली होती. एका पोलसाठी त्या इतकी आक्रमक भूमिका घेऊ शकतात तर नऊ एकर जागेसाठी का घेणार नाहीत. पवार साहेबांनी माझं पत्र ठेऊन घेतलं आणि कोणत्याही परिस्थितीत मी हे मैदान जाऊ देणार नाही, असं सांगितल्याचं वसंत मोरे म्हणाले.

पुण्यातून इच्छुक, राजसाहेबांचा आदेश मला मान्य

तुमच्याकडे बारामती मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली होती. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता तुम्ही कुणाच्या बाजूने असणार असे विचारले असता मी मनसेच्याच बाजूने राहणार आहे. राज साहेब जो आदेश देतील त्याच बाजूने राहणार, वसंत मोरेंनी ठणकावून सांगितले. तसेच आपण पुणे लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यास इच्छुक आहे. मी बारामती लोकसभा मतदारसंघात इच्छुक नाही. मी पुण्यामध्येच इच्छुक आहे अमितसाहेब जर पुण्यात इच्छुक असतील तर मी सरेंडर करायला तयार असल्याचे मोरे यांनी स्पष्ट केले. पुण्यात मनसेचा उमेदवार कोण असेल याची चाचपणी पक्षाच्या वरिष्ठांकडून केली जात आहे. काही जणांच्या नावांची चर्चाही झाली आहे. राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे पुणे लोकसभेचे प्रभारी आहेत. त्यांनी पु्ण्यातील पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या आहेत. या बैठकांचा अहवाल राज ठाकरे यांना देण्यात आला आहे. यानंतर आता पुणे लोकसभेचं तिकीट कुणाला मिळणार हे एक कोडं बनलं आहे. वसंत मोरे की साईनाथ बाबर यांपैकी कुणाला तिकीट मिळणार की ऐनवेळी तिसराच उमेदवार रिंगणात येणार हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे.