प्रकाश आंबेडकरांचा मविआमध्ये समावेश तरी ही रंगले नाराजीनाट्य

मुंबई, ३१ जानेवारी २०२४ : वंचित बहुजन आघाडीला अखेर महाविकास अघाडीत अधिकृत स्थान देण्यात आलं आहे. वंचित बहुजन आघाडीचा आज महविकास आघाडीत समावेश झाला आहे. ॲड.बाळासाहेब आंबेडकर हे २ फेब्रुवारी रोजी महाविकास आघाडीच्या बैठकीत सहभागी होतील अशी माहिती संजय राऊत यांनी दिली आहे.

तसेच वंचित मुळे देशातील हुकूशाही विरोधी लढ्याला नक्कीच बळ मिळेल. भारताचे संविधान धोक्यात आहे. एकत्र येऊन संविधान वाचवावे लागेल, असेही उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत म्हणाले आहेत. मात्र, वंचितच्या प्रतिनिधीला सन्मानाची वागणूक न मिळाल्याने नाराजीनाट्य रंगले आहे.

संजय राऊत यांनी महाविकास आघाडीकडून जारी करण्यात आलेलं पत्र सोशल मीडियावर शेअर केलं आहे. आज झालेल्या बैठकीत महाविकास आघाडीतील घटक पक्ष – काँग्रेस, शिवसेनेचा उद्धव ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा शरद पवार गट यांच्यात वंचितला मविआमध्ये स्थान देण्याबाबत एकमत झाल्याची माहिती या पत्रातून देण्यात आली आहे.

“देश अत्यंत गंभीर परिस्थितीतून मार्गक्रमण करीत आहे. महान लोकशाही परंपरा असलेला देश हुकूमशाहीकडे जातो आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताला महान संविधान दिले. व्यक्ती स्वातंत्र्य व लोकशाहीचा पुरस्कार केला. आज हे सर्व पायदळी तुडवले जाते आहे. २०२४ साली देशात झुंडशाहीने वेगळा निकाल लावला तर बहुदा ही शेवटचीच निवडणूक ठरेल, अशी शंका लोकांना वाटते.”

“ही परिस्थिती बदलून राज्यात व देशात परिवर्तन घडवावे, यासाठी महाविकास आघाडीची स्थापना झाली, हे आपण जाणताच. आपण स्वतः देशातील हुकूमशाही विरुद्ध लढत आहात. आम्ही त्याबद्दल आपले आभारी आहोत. वंचित बहुजन आघाडीने यापुढे अधिकृतपणे महाविकास आघाडीत सामिल व्हावे, अशी आमची भूमिका आहे.”

३० जानेवारी रोजी मुंबई येथे झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीत आपल्या सुचनेनुसार, वंचित बहुजन आघाडीचे प्रतिनिधी सहभागी झाले. वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीत सामिल व्हावे, यावर शिवसेना, काँग्रेस तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे एकमत झाले असून, त्यानुसार वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीत समावेश केला आहे.”
या बैठकीनंतर प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करत महाविकास आघाडीच्या नेत्यांवर परत एकदा हल्लाबोल केला. प्रकाश आंबेडकर म्हणाले “या बैठकीमध्ये वंचितच्या प्रतिनिधींना सन्मानाची वागणूक मिळालेली नाही. पण आम्हाला भाजपचा आणि संघाचा पराभव करायचा असल्याने आम्ही महायुकास आघाडीमध्ये जाण्याचा निर्णय घेतलेला आहे.”