अंतरवाली सराटी येथील लाठीचार्ज टरिंग पॉईंट नाहीतर आंदोलनावरचा डाग –

पुणे, ३१ जानेवारी २०२४: अंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलकांवर पोलिसांनी केलेला लाठीचार्ज आंदोलनाचा टर्निंग पॉईंट नाही तर माझ्या सुरू असलेल्या आंदोलनावरचा सर्वात मोठा डाग आहे, अशा शब्दात जरांगे पाटील यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली तसेच यावेळी झालेल्या दगडफेकीमध्ये आमच्यावर नाही तर पोलिसांवरच १२० ब नुसार कटकारस्थान रचल्याचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी भूमिका ही जरांगे पाटील यांनी घेतली.

पुणे श्रमिक पत्रकार संघामध्ये जरंगे पाटील यांचा वार्तालाप आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना अनेक प्रश्नांची उत्तरे दिली, त्यांची भूमिका स्पष्ट केली. पत्रकार संघाचे अध्यक्ष पांडुरंग सांडभोर, सरचिटणीस सुकृत मोकाशी यावेळी उपस्थित होते.
जरांगे म्हणाले की, माझे शिक्षण केवळ बारावी झालेलं आहे. तसेच मी जास्त काही पुस्तकही वाचलेले नाहीत. मी दैनंदिन जीवनात येणाऱ्या लोकांच्या अडचणी वाचल्या. त्यामुळेच मराठा समाजाच्या अडचणीवर पर्याय काढायचा असेल तर तात्काळ आरक्षणासाठी लढा उभा राहिला पाहिजे. यासाठी आम्ही गोदापट्ट्यातून सुरुवात केली.

त्यातून २९ ऑगस्टला १२३ गावांतील तीन लाख लोकांचा कार्यक्रम झाला. दरम्यान यावेळी आंदोलनावर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जमुळे त्या आंदोलनाला टर्निंग पॉईंट मिळाला. असे मी म्हणणार नाही. कारण आमच्या आया-बहिणींची डोके फोडून आम्हाला आरक्षण नको होतं. महिला आणि मुलांना यामध्ये क्रूरपणे मारलं गेलं. लाठीचार्ज झाला. त्या अगोदरच्या दिवशी पोलिसांनी सांगितल्यानंतर मी मराठा बांधवांना घरी परतण्याचा आवाहन केलं होतं.

दुसऱ्या दिवशी अंतरवालीमध्ये मात्र पोलिसांनी निर्दयीपणे मराठा बांधवांना मारहाण केली. हा माझ्या आंदोलनाचा टर्निंग पॉईंट नाही. तर आंदोलनावरील एक मोठा डाग आहे. इतकं निर्दयी सरकार मी माझ्या जीवनात कधीच पाहिले नाही. त्यामुळे तेढ निर्माण होणारच. तसेच आम्हाला आंदोलनामध्ये धिंगाणा करायचा असता तर त्याच दिवशी केला असता मात्र आमचं हे शांततेत आंदोलन सुरू होतं.

यावेळी भुजबळांवर बोलताना जरांगे म्हणाले की, भुजबळ यांना वयाने एक मोठा व्यक्ती म्हणून माझी पुन्हा विनंती आहे की, त्यांनी अशी आव्हान देऊ नयेत. कारण आम्हाला कुणाच्या मुलांचं वाटोळ करून आमच्या मुलांचे भलं करायचं नाही. मात्र आम्ही सुद्धा पुरावा असल्याशिवाय बोलत नाही. त्यामुळे ओबीसी बांधवांनी त्यांना एकदा समजून सांगावं की, तुमच्या राजकीय स्वार्थासाठी तुम्ही गोरगरीब मुलांचं वाटोळ करू नका. त्यांना जर खरंच ओबीसी बांधवांची काळजी असते. तर त्यांनी धनगर आरक्षण आरक्षणाबाबतची भूमिका स्पष्ट केली असती. मी तसे त्यांना आव्हान दिलं होतं. तसेच बारा बलुतेदार जातींच्या आरक्षणाबद्दल देखील ते भूमिका स्पष्ट करत नाहीत. त्यामुळे त्यांच्या राजकीय स्वार्थापोटी सामान्य ओबीसींच आरक्षण घालून बसतील. त्यांनी आमचं आरक्षण घालवण्यासाठी प्रयत्न केला.