ड्रग्ज माफीया ललित पाटील प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी आमदार रवींद्र धंगेकर उतरले रस्त्यावर

पुणे, २९ नोव्हेंबर २०२३ : ड्रग्ज माफीया ललित पाटील प्रकरणाची सखोल चौकशी करून इतर दोषी अधिकाऱ्यांना अटक करा, ‘ससून’चे तत्कालीन अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करा, या मागणीसाठी काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी पोलीस आयुक्त कार्यालयासमोर बुधवारी ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर पोलीस आयुक्तांची भेट घेवून त्यांना याबाबतचे निवेदनही देण्यात आले.

ड्रग्ज माफीया ललित पाटील प्रकरणी काँग्रेसचे आमदार श्री. रवींद्र धंगेकर हे सातत्याने आवाज उठवत आहेत. त्यामुळे या प्रकरणाच्या तपासाची फाईल अद्याप बंद झाली नाही. मात्र, शासनाच्या दबावामुळे पोलीस संथ गतीने तपास करीत आहेत. दोषी अधिकाऱ्यांना अटक करीत नाहीत. त्यांची चौकशीही केली जात नाही. या विरोधात आमदार रवींद्र धंगेकर यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले.

आमदार रवींद्र धंगेकर म्हणाले, अमली पदार्थ तस्कर ललित पाटील हा ससून रुग्णालयातून पळून जाण्याच्या घटनेला जवळपास दोन महिन्यांचा कालावधी झाला. ज्या व्यक्तींनी ललित पाटीलला पळून जाण्यात मदत केली, त्या सर्वांवर कारवाई झाली पाहिजे. ससून मधून तो ड्रग्ज विकत होता. हे प्रकरण माहिती असूनही याकडे डोळेझाक करणाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे. ससूनमध्ये तत्कालीन अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर, काही वरिष्ठ पोलीस हे ललित पाटीलचे लाड पुरवत होते. त्यांची कसून चौकशी करून कारवाई होत नाही, तोवर आम्ही शांत बसणार नाही. लोकशाही मार्गाने आमचा लढा सुरूच राहील.

अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांना केवळ पदमुक्त करण्यात आले आहे. ते चौकशी समितीच्या अहवालानुसार दोषी आहेत. त्यामुळे डॉ. ठाकूर यांच्यावर झालेली कारवाई पुरेशी नसून त्यांना अटक करण्यात यावी. त्यांना सहआरोपी करून, त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई व्हायला हवी. पण, पोलीस टाळाटाळ करीत आहेत. याचा अर्थ त्यांच्यावर शासनाचा दबाव आहे. शासनातील ती मोठी व्यक्ती कोण आहे? हे जनतेला समजले पाहिजे. ललित पाटीलकडून कोणकोणते साहित्य, रोख रक्कम किती जप्त केली आहे, याबाबत पोलिसांकडून माहिती दिली जात नाही, असे रवींद्र धंगेकर यांनी सांगितले.या आंदोलनात गोपाळ तिवारी,बुवा नलावडे,प्रविण करपे,राजू नाणेकर,सुरेश जैन,प्रशांत सुरसे,गोपाळ आगरकर,सुरेशकांबळे,संदीप मोरे,ऋषिकेश बालगुडे,साकिद आबाजी,राकेश नामेकर,गौरव बाळंदे,रिपब्लिकन संघर्ष दलाचे संजय भिमले ,जयहिंद संघट्नेचे सुनील नवले,हेमत वाशीकर उपस्थित होते.