जाणीवपूर्वक विरोधी पक्षातील नेत्यांवर गुन्हे दाखल, जयंत पाटील धावले ठाकरेंच्या मदतीला

मुंबई, २९ नोव्हेंबर २०२३: ठाकरे गटाचे नेते आणि माजी महापौर दत्ता दळवी यांच्यावर गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे. यावरुन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. जाणीवपूर्वक विरोधी पक्षातील नेत्यांवर गुन्हे दाखल केले जात आहेत, असे त्यांनी म्हटले.

मुंबईत आदित्य ठाकरेंनी एका पुलाचं उदघाटन केलं. कारण त्यांच्या मतदारसंघातील पुल होता. पुल पुर्ण झाला पण वापर होत नव्हता. हे दिसायला बरे नाही. आदित्य ठाकरेंनी उदघाटन करुन सरकारला सोईच करुन दिलं. लोक प्रवास करायला लागले, ट्रॅफिकची समस्या कमी झाली. पण आदित्य ठाकरेंवर गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर मंत्र्यांनी पुन्हा जाऊन उदघाटन केलं, ही राज्याच्या इतिहासातील पहिलीच घटना आहे. जाणीवपूर्वक विरोधी पक्षातील नेत्यांना त्रास देण्यासाठी गुन्हे दाखल केले जात आहेत, असे जयंत पाटील म्हणाले.

आमदार रोहित पवार यांची संघर्ष यात्रा सुरु आहे. पण राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजून सहभागी झाले नाहीत. यावर जयंत पाटील म्हणाले की आत्ता अनिल देशमुख आहेत, राजेश टोपे होते. संदीप क्षीरसागर आहेत. संघर्ष यात्रेच्या वाटेवरील सर्व नेते सहभागी झाले आहेत. ती यात्रा राज्यातील युवकांच्या प्रश्नांची आहे. त्यामुळे १२ तारखेला नागपूरला या यात्रेचा समारोप होणार आहेत. त्यावेळी ज्येष्ठ नेते देखील सहभागी होतील, असे त्यांनी सांगितले.
ते पुढं म्हणाले की नंदूरबार जिल्ह्यात २५ ते ३० हजार क्विटल मिरची खरेदी केल्यानंतर भिजलेली आहे. मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झालं आहे. जळगाव, नाशिकमध्ये द्राक्ष बागायदार आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सरकारने पंचनाम्याच्या सुचना दिल्या आहेत पण सरकाराचा अनुभव पाहिला तर या सर्वांची अंमलबजाणी केली जाईल असे वाटत नाही. त्यामुळे जळगाव जिल्ह्यात शेतकरी आक्रोश मोर्चा ठेवला आहे, असे जयंत पाटील यांनी सांगितले.