अजित दादांना त्यांची इच्छा बोलून दाखवावी लागली हे दुर्देवच – चंद्रशेखर बावनकुळे यांचे राष्ट्रवादीतील वादावर भाष्य

बारामती, २४ जून २०२३: अजित पवार हे त्यांच्या पद्धतीने काम करणारे नेते आहेत. त्यांनी त्यांच्या कामाची चमक अनेकदा मंत्रिमंडळात दाखवली आहे. त्यांना पक्ष संघटनेत काम करण्याची इच्छा आहे, हे त्यांना बोलून दाखवावं लागलं. हेच मोठं दुर्दैव आहे.”अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.

मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेतृत्वबदलाचे वारे वाहू लागले आहेत. शरद पवारांनी अलीकडेच खासदार सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. या नियुक्तीनंतर आता आजित पवारांनी पक्ष संघटनेत काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष पदावरून रस्सीखेच सुरू असल्याचं बोललं जात आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज बारामतीत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादीतील अंतर्गत वादावर भाष्ट केले.

बावनकुळे पुढे म्हणाले, “खरं तर, अलीकडेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तीन दिवस नाट्य सुरू होतं. तेव्हा माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला आणि राष्ट्रवादीसह इतर सर्वच पक्षातील नेत्यांना वाटलं होतं की, शरद पवारांनी भाकरी फिरवण्याची भाषा केली आहे, म्हणजे ते अजित पवारांना राष्ट्रीय अध्यक्ष करतील. पण तीन दिवसांत घरगुती नाट्य झालं. त्यानंतर शरद पवार पुन्हा राष्ट्रीय अध्यक्ष झाले. त्यांच्या पक्षाचं काय करावं, याचा निर्णय त्यांनीच घ्यायला हवा.

पण शरद पवार हे अजित पवार किंवा छगन भुजबळ यांना कार्यकारी अध्यक्ष पदावर नेमतील, असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटलं होतं. पण त्यांनी सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती केली. आता अजित पवारांनी पक्ष संघटनेत काम करण्याची इच्छा बोलून दाखवली. अजित पवारांनी इच्छा व्यक्त केल्यानंतर छगन भुजबळांनीही विधान केलं. आता त्यांना कुणी बोलायला लावलं, हे मला माहीत नाही,” असं विधान चंद्रशेखर बावनकुळेंनी केलं.

भुजबळ म्हणाले की, प्रदेशाध्यक्षपद ओबीसींना द्यावं. राष्ट्रवादी काँग्रेसला ओबीसीची आठवण आली, हाही गंमतीचा भाग आहे. त्यामुळे राष्ट्रवादीमध्ये जे काही नाट्य सुरू आहे, तो एक नाटकाचा भाग आहे. कारण सर्वांना माहीत आहे, भाकरी काही फिरवली जाणार नाही. भाकरी फिरवण्याची कुणाची तयारीही नाही. अजित पवारांना अध्यक्ष बनवलं तर चांगलंच आहे, ते त्यांच्या पक्षाला वाढवू शकतात. पण शरद पवार भाकरी फिरवतील का? यावर शंका आहे, ” असंही बावनकुळे म्हणाले.