ठाकरेंनी अमृता फडणवीच्या चॅटिंगचा केला उल्लेख, तर फडणवीस म्हणाले, ठाकरे बालबुद्धी

मुंबई, २४ जून २०२३: बिहारमधील पाटणा येथे पार पडलेल्या भाजपच्या विरोधकांची संयुक्त बैठकीला ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपस्थिती लावली. त्यामुळे टिकाटिपनी सुरू असताना देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यातील वाद टोकाला गेला आहे. या बैठकीला ठाकरे उपस्थित राहिल्याने देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे कुटुंबाला वाचवण्यासाठी पाटण्याला गेले, अशी टीका होती, त्यावर ठाकरेंनी अमृता फडणवीस यांच्या व्हायरल झालेल्या चॅटिंगवर बोललो तर तुम्हाला शवासन करावं लागेल असे प्रत्युतर दिले. त्यानंतर आता फडणवीस यांनी ठाकरेंना बालबुद्धी असा उल्लेख करून टीकेची धार आणखी तीव्र केली आहे.

“मी शुक्रवारी (२३ जून) शिवसैनिकांना सांगून पाटण्याला गेलो. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मनात आपली किती भिती बसली आहे. मी पाटण्याला गेलो, तर हे लगेच म्हणतात हे कुटुंब वाचवायला गेले आहेत. देवेंद्र फडणवीसांनी इतक्या खालच्या पातळीवर येऊ नये. फडणवीसांनाही कुटुंब आहे. त्यांच्या कुटुंबातील व्हॉट्सअ‍ॅप चॅट बाहेर येत आहेत. आम्ही अद्याप त्यावर बोललेलो नाही. जर फडणवीसांच्या कुटुंबावर बोलावं लागलं, तर त्यांना केवळ शवासन करावं लागेल. त्यांना वेगळी कोणतीही आसनं झेपणार नाहीत. केवळ शवासन, फक्त पडून रहावं लागेल. योगा डे.” अशी टीका उद्धव ठाकरे यां केली.

उद्धव ठाकरेंना उद्देशून केलेल्या ट्वीटमध्ये देवेंद्र फडणवीस म्हणाले, “मी, माझे कुटुंब आणि माझा संपूर्ण भाजपा परिवार एक खुली किताब (पुस्तक) आहे. ज्या ‘व्हॉट्सअ‍ॅप चॅट’बाबत तुम्ही बोलत आहात, तो आरोपपत्राचा भाग आहे. हे न्यायालयाच्या रेकॉर्डवर आहे. ते जाणीवपूर्वक टाकले आहेत. कारण आमच्याकडे लपवण्यासारखं काहीच नाही. पण मुख्यमंत्रीपदी राहिलेल्या माणसाला इतकी ‘बालबुद्धी’ असावी, याचं मात्र आश्चर्य वाटते. त्यामुळे त्याची फार चिंता तुम्ही करु नका.”
“चिंता करायचीच असेल आणि पुस्तक काढायचेच असेल तर, सामान्य शिवसैनिकांना वार्‍यावर सोडून मुख्यमंत्रीपद, मंत्रीपद घरात कसे ठेवले? मुंबईला कुणी लुटले? मृतांच्या टाळूवरील लोणी कुणी खाल्ले? मराठी माणसाला कुणी ओरबाडले? १०० कोटींच्या वसुलीचे टार्गेट कसे दिले जाते? यावर पुस्तक काढा. तुमचं हिंदुत्व आणि तुमचे कारनामे आता एकेक करीत जनतेत उघड होतच आहेत आणि होतच राहणार,” असंही फडणवीस म्हणाले. आम्ही कुणाच्या घरात घुसत नाही. पण घुसलोच तर त्यांना तोंड दाखवायला जागा उरणार नाही. तुमचे ‘नड्डे’ (नड्डे म्हणजे घसा) केव्हा सैल होतील, हे समजणारदेखील नाही. तोवर तुमची हास्यजत्रा चालू द्या. आता शवासन कुणाला करावं लागतं, ते बघूच” असा थेट इशारा देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना दिला.