आरक्षण कधी मिळणार हे मुख्यमंत्र्यांना विचारा – राज ठाकरेंचा जरांगेंना खोचक प्रश्न

मुंबई, २७ जानेवारी २०२४ : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांना चिमटा काढला आहे. जरांगेंचं अभिनंदन करुन त्यांनी आरक्षण कधी मिळणार? असा खोचक प्रश्न विचारला आहे.

मनोज जरांगे पाटील ह्यांचं अभिनंदन. सरकारने तुमच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या! आता फक्त आरक्षण मिळायचं बाकी आहे. ते कधी मिळणार हे पण एकदा मुख्यमंत्र्यांना विचारा, म्हणजे आपल्या मराठा बांधवांना, भगिनींना ही खरी परिस्थिती समजेल! लोकसभा निवडणुकीआधी पारदर्शकता येईल ही अपेक्षा!
असं ट्वीट करुन राज ठाकरे यांनी आरक्षणावरुन प्रश्न उपस्थित केला आहे. एकीकडे सगळ्या मागण्या मान्य झाल्या असं मराठा मोर्चाकडून सांगितलं जात असलं तरी प्रत्यक्षात शासनाने केवळ अधिसूचना काढलेली आहे.

राज्य शासनाने अधिसूचना काढून कुणबी प्रमाणपत्र वाटप करताना सगेसोयऱ्यांना कसे देता येईल, याबाबत भूमिका स्पष्ट केली आहे. परंतु आता फक्त मसुदा तयार केला असून त्यावरील निर्णय १६ फेब्रुवारी रोजी किंवा त्यानंतर होणार आहे.
त्यावरुनच राज ठाकरेंनी प्रश्न उपस्थित केला आहे. सगळ्या मागण्या मान्य झाल्यात तर मग आरक्षण कधी मिळणार, हे मुख्यमंत्र्यांना विचारा.. असं राज ठाकरे म्हणत आहे. त्यांनी आपल्या एक्स हँडलवर यासंबंधी पोस्ट केलीय.

दुसरीकडे आरक्षण मिळाल्याच्या आनंदात राज्यभर मराठा आंदोलक दिवाळी साजरी करीत आहेत. कुठे फटाके तर कुठे आतषबाजी केली जातेय. तर कुठे फुलं उधळली जात आहेत. तर सर्वत्र गुलालाची उधळण होतेय. त्यामुळे नेमकं आरक्षण मिळालं आहे का, नसेल मिळालं तर ते कधी मिळणार.. असे प्रश्न आता उपस्थित होऊ लागले आहेत.

विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप