मुंबईत घेऊन जाण्यासाठी मराठ्यांची संख्या ३ कोटी आहे का? – ओबीसी नेत्याचा जरांगे-पाटलांना डिवचले

वडीग्रोदी, २९ डिसेंबर २०२३: मराठा आरक्षणासाठी मुंबईत करण्यात येणाऱ्या आंदोलनाचा मार्ग आंदोलनकर्ते मनोज जरांगे-पाटील यांनी गुरूवारी ( २८ डिसेंबर ) जाहीर केला. २० जानेवारी रोजी अंतरवाली सराटी येथून निघणारी पदयात्रा सहा जिल्ह्यांतून जाणार असून, यामध्ये ३ कोटी मराठा समाज सहभागी होईल, असा दावा मनोज जरांगे-पाटील यांनी केला होता. यावर ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांनी टीका केली आहे.

वडीग्रोदी येथील ओबीसी समाजाचं साखळी उपोषण २७ व्या दिवशी मागे घेण्यात आलं. त्यानंतर बबनराव तायवाडे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. “मुंबईत घेऊन जाण्यासाठी राज्यात मराठ्यांची संख्या ३ कोटी तरी आहे का? जरांगे-पाटलांच्या आंदोलनाची धार आता कमी झाली आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी ही घरची शेती आहे का?” असा सवालही बबनराव तायवडेंनी जरांगे-पाटलांना विचारला आहे.

“रस्त्यात थांबाल तेथेच स्वयंपाक करून खायचा”
दरम्यान, मनोज जरांगे-पाटील यांनी गुरूवारी मुंबई पायी पदयात्रेचा मार्ग जाहीर केला. २० जानेवारी रोजी अंतरवाली सराटी येथून निघणारी पदयात्रा सहा जिल्ह्यांतून जाणार आहे. यावेळी संवाद साधताना जरांगे-पाटलांनी सांगितलं, “पदयात्रेत येणाऱ्या प्रत्येक तुकडीच्या प्रमुखांनी आणि स्वयंसेवकांनी आपल्या तुकडीतील समाजबांधवांच्या जेवणाची सोय करायची आहे. यासाठी एका वाहनातून मीठ, मिरची, तेल, ५० किलो बाजरी पीठ, ५० किलो गव्हाचे पीठ, ५० किलो तांदूळ, डाळी, छोटी चूल, पाण्याचे ड्रम, टँकर बरोबर घ्यावे. जेथे रस्त्यात थांबाल तेथेच स्वयंपाक करून खायचा आहे. मराठा बांधवांना झोपण्यासाठी आणि खाण्यापिण्याच्या वस्तू मुंबईला घेऊन जाव्या लागणार आहेत. त्यामुळे सगळी वाहनं बाहेर काढावीत. कुणाच्याही वाहनांना धक्का लागणार नाही. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. पोलिसांनी वाहनं अडवण्याचा प्रयत्न केला, तर गृहमंत्र्यांच्या नागपूर आणि मुंबईतील घरी जाऊन बसू,” असा इशारा जरांगे-पाटलांनी दिला आहे.