खडसेंसोबत राष्ट्रवादीत गेलेले नगरसेवक पुन्हा भाजपवासी

जळगाव, २९ ऑगस्ट २०२३: जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणारी घटना घडली आहे. राज्याच्या राजकारणात पक्षांतराला वेग आला असून याचा फटका शरद पवार गटाचे नेते आमदार एकनाथ खडसे यांनाही बसला आहे. खडसे यांच्यासोबत राष्ट्रवादीची वाट धरलेल्या पदाधिकाऱ्यांनी पुन्हा घरवापसी करत भाजपचा झेंडा हाती घेतला आहे. एकनाथ खडसे यांच्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले भाजपचे पाच माजी नगरसेवक आणि पदाधिकारी पुन्हा भाजपात आले आहेत. आमदार संजय सावकारे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. या फोडाफोडीच्या राजकारणाचा मोठा धक्का राष्ट्रवादीला बसला आहे.

एकूण नऊ नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. यापैकी पाच जण पुन्हा स्वगृही आले आहेत. प्रभारी नगराध्यक्ष प्रमोद नेमाडे, माजी नगरसेवक बोधराज चौधरी, माजी नगरसेविका शैलजा नारखेड यांचे पती पुरुषोत्तम नारखेडे, माजी नगरसेविका शोभा नेमाडे यांचे पुत्र दिनेश नेमाडे, अनिकेत पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

या नऊ माजी नगरसेवकांपैकी दोन जणांनी आधीच भाजपात प्रवेश केला होता. आता राहिलेले दोघेही भाजपाच्या वाटेवर असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे, भाजपात आलेले हे माजी नगरसेवक आ. खडसे यांचे निष्ठावंत म्हणून ओळखले जातात. त्यामुळे निवडणुकीआधी हे पक्षांतर खडसेंसाठी धक्का असल्याचे मानले जात आहे.

राज्यात निवडणुकांचे वारे वाहत असून या काळात भाजपाने पक्ष विस्तारावर लक्ष केंद्रीत केले आहे. यात जळगाव जिल्ह्यावरही भाजपाचे विशेष लक्ष आहे. येथे एकनाथ खडसे यांच्याबरोबर गेलेल्या जुन्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना पुन्हा भाजपात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. या प्रयत्नांना यशही मिळत आहे. आताही भाजपाने शरद पवार गटाला जोरदार धक्का दिला आहे. काही जुन्या पदाधिकाऱ्यांचा पक्ष प्रवेश घडवून आणला आहे. या राजकारणातून आता खडसे पक्षाला कसे सावरतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.