माजी मंत्री उदय सामंत यांच्या समर्थकांची शिवसेनेतून हकालपट्टी

मुंबई, १८/०७/२०२२: माजी मंत्री उदय सामंत यांच्या रत्नागिरी दौऱ्यात हजेरी लावणाNया कट्टर समर्थक आणि शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बाबू म्हाप, शहरप्रमुख बिपिन बंदरकर व महिला संघटक कांचन नागवेकर यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. उपजिल्हाप्रमुखपदी निवड झालेले प्रकाश रसाळ यांनी तब्येतीच्या कारणास्तव पद स्वीकारत नसल्याचे पत्र जिल्हाप्रमुखांना पाठविल्याने पक्षाला धक्का दिला आहे.

 

एकनाथ शिंदे यांच्या बंडामध्ये सहभागी झालेले आमदार उदय सामंत शुक्रवारी प्रथमच रत्नागिरीत आले होते. त्यांच्या स्वागतासाठी शिवसेनेतील समर्थकांनी सकाळी पाली येथील निवासस्थानी आणि त्यानंतर रत्नागिरीतील शासकीय विश्रामगृहातही गर्दी केली होती. दौऱ्यानंतर शिवसेनेकडून सामंत समर्थकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. म्हाप, बंदरकर आणि नागवेकर यांना रविवारी पदांवरून हटवत शिवसेनेकडून नवीन नियुक्त्या करण्यात आल्या. दरम्यान, रत्नागिरीतील इच्छुकांच्या नावांवर चर्चा झाल्यानंतर अंतिम नावे वरिष्ठांकडे पाठविण्यात आली होती. पण त्यापैकी उपजिल्हाप्रमुखपदी निवड झालेल्या रसाळ यांनी पत्राद्वारे पदावर काम करण्यास असमर्थता व्यक्त केली. त्यामुळे काही तासांतच नियुक्ती नाकारल्यामुळे शिवसेनेला धक्का बसला आहे.