वंचितचे महाविकास आघाडीसोबत काही ठरेना, आंबेडकरांनी जाहीर केले तीन उमेदवार

अकोला, ४ मार्च २०२४ ः एकीकडे महाविकास आघाडीच्या जागावाटपाच्या चर्चा अंतिम टप्प्यात असल्याचे सांगण्यात येत आहे. दुसरीकडे मात्र वंचितच् अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीला दणका देत तीन उमेदवारांची घोषणाही केली आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडीमध्ये वंचित नसणार हे जवळपास निश्चित झाल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान वंचित आघाडीचे सर्वेसर्वा अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी वंचित आघाडीची अद्याप महाविकास आघाडीशी पूर्णपणे युती झालेली नाही. असे पुन्हा एकदा स्पष्ट केले होते. तसेच त्यांनी आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना महत्वाचे आवाहन केले होते. त्यानंतर लगेचच त्यांनी हा निर्णय देखील घेतला आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी आज (३ मार्च) अकोल्यात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी आपल्या पक्षाच्या लोकसभेच्या तीन जागांवरील उमेदवार कोण असतील याची घोषणा केली? यामध्ये स्वतः प्रकाश आंबेडकर हे अकोल्यातून लढणार आहेत. तर वर्धा येथे राजेंद्र साळुंखे आणि सांगलीतून चंद्रहार पाटील यांना लोकसभेची उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. तर याच पत्रकार परिषदेमध्ये आंबेडकर यांना महाविकास आघाडीची युती होणार का? असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले, आम्ही देखील याबाबत अद्याप संभ्रमात आहोत. आम्ही आघाडीचा भाग आहोत की नाही हेच आम्हाला कळत नाही.

तसेच आमची ताकद असलेल्या जागांची माहिती आम्ही महाविकास आघाडीला दिली आहे. त्यामध्ये महाविकास आघाडीने 15 जागा ओबीसी आणि तीन अल्पसंख्याकांना द्यावेत. असे सांगण्यात आलं मात्र महाविकास आघाडीतील नेत्यांकडून माध्यमांमध्ये हे आमच्या अटी असल्याचे सांगितलं. तसेच कार्यकर्ते हे उत्साही असतात. त्यामुळे पक्षात भांडण वाढू नये, डोकेदुखी वाढू नये म्हणून मी महाविकास आघाडीच्या बैठकीला जाऊ नका. असं कार्यकर्त्यांना सांगितलं आहे. असं ही यावेळी आंबेडकर म्हणाले.