Pune: PM Modi's Accusations of Rs 70,000 Crore Corruption by NCP Met with Sharp Response from Sharad Pawar

पंतप्रधानांनी पदाची किंमत ठेवली नाही – शरद पवार यांची मोदींवर सडकून टीका

पुणे, २९ एप्रिल २०२४: मनमोहन सिंग पंतप्रधान असताना वर्षभराचा कामकाजाचा लेखाजोखा हे पत्रकार परिषद घेऊन सांगत असे. आत्ताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहा वर्षात एकदाही पत्रकार परिषद घेतलेली नाही. आपल्या देशाचा कारभार हुकूमशाहीच्या मार्गावर आहे. याचा अर्थ आपल्या देशाच्या संविधानावर संकटाचे ढग दिसू लागले आहे. देशाचे दिवंगत पंतप्रधान यांच्यावर टीका करतात, टीका करा यामुळे आम्हाला अंगाला भोक पडत नाही. परंतु, पंतप्रधान ही एक संस्था आहे, या पदाची तरी किंमत ठेवली नसल्याची सडकून टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर केली.

उरुळी कांचन (ता. हवेली) येथे शिरूर हवेली लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे (राष्ट्रवादी काॅंग्रेस शरद पवार गट) यांच्या प्रचारसभेत शरद पवार बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार डॉ. अमोल कोल्हे, माजी आमदार अशोक पवार तसेच पदाधिकारी , कार्यकर्ते आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना उमेदवार डॉ. अमोल कोल्हे म्हणाले, की शेवटच्या श्वासापर्यंत लढणार आहे. ही निवडणूक सर्वसामान्य जनतेने हाती घेतलेली आहे. पंतप्रधान प्रचारासाठी येतात पण ते छत्रपती शिवरायांना वंदन करण्यासाठी येत नाही. जनताच या निवडणुकीत उत्तर देईल.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, महाराष्ट्र हा लढणाऱयांच्या मागे उभा राहतो. म्हणून मतदारसंघ आमच्या सोबत ठामपणे उभा आहे. आम्ही लाचारी स्वीकारत नाही. महाराष्ट्राची हवा बदली आहे. येथील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवायचा आहे. भैरोबा नाला ते चौफुला अशा उड्डाण पुलाचे नियोजन आहे. अजूनही बरेचसे प्रश्न आहेत ते सोडविण्यासाठी तत्वांवर ठाम असणारे आपले उमेदवार निवडून द्या.

शिरूर -हवेली चे आमदार अशोक पवार म्हणाले, की शरद पवार यांचे दूरदृष्टी नेतृत्व आपल्याला लाभलेले आहे. त्यांनी पुन्हा एकदा सक्षम असा उमेदवार आपल्याला दिला आहे. जो पक्षाशी एकनिष्ठ आहे. ज्यांनी लोकसभा गाजवली आहे. कांदा प्रश्न, दूध दर वाढ, सर्वसामान्यांचे प्रश्न संसदेत मांडतात. त्यावर घणाघात करत असतात. उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा.

कार्यकर्त्यांनी झळकवले पोस्टर

आयोजित महासभेत सात हजारहून अधिक जनसमुदाय याठिकाणी उपस्थित होता. यावेळी कार्यकर्त्यांनी ‘गाडा गद्दारी, वाजवा तुतारी’ चे पोस्टर व्यासपीठावर झळकवले.