मुख्यमंत्र्यांच्या घरातील गोष्टी चव्हाट्यावर – सत्तार यांनी व्यक्त केली नाराजी

नागपूर, ३१ डिसेंबर २०२२: मुख्यमंत्र्यांच्या घऱात झालेल्या चर्चेतील गोष्टी बाहेर येत असल्याने कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी नाराजी जाहीर केली आहे. यासंबंधी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार केली असून चौकशीची मागणीही केली आहे. इतकंच नाही तर आपल्याविरोधात रचण्यात आलेल्या कटात पक्षातील नेता सहभागी असू शकतो असं सूचक विधानही त्यांनी माध्यमांशी बोलताना केलं आहे. अब्दुल सत्तार यांच्या या दाव्यामुळे शिंदे गटात अंतर्गत कुरघोडी सुरु असल्याची चर्चा रंगली आहे.

“मी एक छोटा कार्यकर्ता आहे, मात्र यांनी संपूर्ण महाराष्ट्राला गिळलं असून यांच्या चौकशा झाल्या तर भुई पळता थोडी होईल,” असं अब्दुल सत्तार विरोधकांना उद्धेशून म्हणाले. “मुख्यमंत्र्यांकडे सर्वांचा डेटा जमा आहे. मुख्यमंत्री सभागृहात बोलले आहेत. मी तर आधीच टीईटीमध्ये एका कागदाचाही फायदा घेतला असेल तर फासावर लटकवा म्हटलं आहे. जोपर्यंत देव माझ्यासह आहे तोपर्यंत काही होणार नाही,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान त्यांच्याविरोधातील कटात कोण सहभागी आहे असं विचारलं असता ते म्हणाले “आमच्या पक्षातील असतील, काही हितचिंतक असतील किंवा विरोधी पक्षात ज्यांच्या खूर्च्या रिकाम्या झाल्या तेही असू शकतात”.

यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या घरात झालेली चर्चा बाहेर येत असल्याचं सांगत नाराजी जाहीर केली. “आम्ही मुख्यमंत्र्यांच्या घरात चर्चा करत होतो. ती चर्चा बाहेर आली तेव्हा मी त्यांना चुकीच्या बातम्या बाहेर येत असल्याचं सांगितलं. मी कोणाचंही नाव घेतलं नाही. त्याचा तपास मुख्यमंत्री करणार आहेत. त्यांच्याकडे मी तक्रार केली आहे”.

“विरोधी पक्षात माझे फार हितचिंतक आहेत. माझ्यासारख्या अल्पसंख्यांक समाजाच्या माणसाला इतकं महत्वपूर्ण खातं कसं दिलं याबद्दल काही लोकांच्या मनात खदखद आहे. पण ते त्याचं काम करतात मी माझं काम करतो,” असं अब्दुल सत्तार यांनी सांगितलं.

यावेळी त्यांनी अजित पवारांच्या आरोपांना उत्तर देताना मी राष्ट्रवादी पक्षात आलो नाही याची चीड आहे का? अशी विचारणा केली. मी लोकांसाठी लढत आहे, भांडत आहे, काम करत आहे. काही लोक मात्र फक्त उद्योगपतींसाठी काम करतात असा आरोपही त्यांनी केला.