मी छातीवर गोळी घ्यायला ही तयार पण भीमा कोरेगावात येणार नाही – चंद्रकांत पाटील

पुणे, १ जानेवारी २०२३ : डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांनी भीक मागून शाळा चालू केल्या असे वक्तव्य राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री व पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केल्यानंतर त्यांच्यावर शाई फेकीचा प्रकार घडला होता. त्याचेच पडसाद आज भीमा कोरेगाव येथे उमटण्याची शक्यता होती. चंद्रकांत पाटील पालकमंत्री या नात्याने विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी गेले तर त्यांच्यावर हल्ला केला जाईल असा इशारा देण्यात आलेला होता. त्यामुळे भीमा कोरेगावला न जाण्याचा निर्णय पाटील यांनी घेतला आहे. “मी छातीवर गोळी घ्यायला तयार आहे, विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या सामान्य आंबेडकर प्रेमींना त्रास होऊ नये यासाठी मी घरातूनच अभिवादन करत असल्याचे” चंद्रकांत पाटील यांनी पत्रकाद्वारे स्पष्ट केलेले आहे. या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांनी एक पत्र लिहून प्रकाशित केले आहे पत्राचा मजकूर पुढीलप्रमाणे.

II जय भीम II
शौर्य दिनाच्या निमीत्ताने, दिनांक एक जानेवारीला युध्दात प्राणाची आहुती दिलेल्या सैनिकांच्या शौर्याचे प्रतीक म्हणून त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ भीमा कोरेगावला उभारलेल्या विजयस्तंभास अत्यंत विनम्र अभिवादन करतो.
सर्वांनी शांततेने शौर्याचे प्रतीक असलेल्या विजयस्तंभास मानवंदना द्यावी दर्शन घ्यावे.
कोणतीही जातीय तेढ निर्माण होऊ नये यासाठी सर्वांना अत्यंत नम्र आवाहन. शौर्य दिनाच्या निमीत्ताने मानवंदना देण्यास, अभिवादन करण्यास भीमा कोरेगाव येथे शौर्याचे
प्रतीक असलेल्या विजयस्तंभास मानवंदना देता यावी व येणाऱ्यांना अतिशय श्रद्धेने विजयस्तंभास मानवंदना देता यावी दर्शन घेता यावे यासाठी सरकारने सर्व सुविधा उभारल्या आहेत. त्या क्षेत्राच्या विकासासाठी १०० कोटी रुपयांचा निधीही देण्याचे शासनाने निश्चित केले आहे.
बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिनांक ०१ जानेवारी १९२७ रोजी
आपल्या अनुयायांसह, भीमा कोरेगाव येथे शौर्याचे प्रतीक असलेल्या विजयस्तंभास मानवंदना दिली होती. तेव्हापासून हजारो, लाखो अनुयायी दरवर्षी भिमाकोरेगांवला विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी येत असतात. बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल माझ्या मनात प्रचंड श्रद्धा आहे तिचे जाहीर प्रदर्शन करणे हा माझा स्वभाव नाही. सन १९८२ साली स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जन्मशताब्दी निमित्त अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने रत्नागिरीचे पतीतपावन मंदिर ते दादरच्या चैत्यभूमी पर्यंत एक महिनाभर चाललेल्या समता यात्रेचे नेतृत्व मी केलं आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव मराठवाडा विद्यापीठाला द्यावं यासाठी शेकडो गावांमध्ये केलेल्या संवाद यात्रेचे
नेतृत्वही मी केलं आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती घराघरात साजरी व्हावी व नव्या पीढी पर्यंत त्यांचे विचार पोहोचावेत म्हणून प्रत्यक्ष प्रयत्न केले, आजही, एक नाही दोन नाही कोल्हापुरातील वस्त्यांमध्ये, झोपडपट्ट्यांमध्ये मी लहान मुलांच्या बुद्धीचा विकास करणारी ‘खेळघरे’ सुरू केली आहेत, व वंचितांचा शैक्षणीक विकासासाठी मी वचनबध्द आहे. मी दोन वेळा दिलगिरी व्यक्त
करुनही माझ्या विधानाचा विपर्यास करून, माझ्यावर शाई फेकण्याचा भ्याड हल्ला झाला.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान झाला म्हणणाऱ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची घटना पायदळी तुडवली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कुठल्याही आंदोलनात अपवादानेही हिंसा नव्हती, आताही मी भीमा कोरेगाव ला विजयस्तंभाच्या दर्शनास व अभिवादनास आलो तर पुन्हा शाई फेकू म्हणून धमकी आली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मार्गाने चालण्यासाठी मी शाईच काय छातीवर गोळ्याही झेलण्यास तयार आहे, परंतु हजारो, लाखो अनुयायी दरवर्षी भिमाकोरेगांवला विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी येणाऱ्यांमध्ये, अशा एखाद्या घटनेमुळे गालबोट लागावे, जातीय दंगे व्हावे, अशी काही जणांची सुप्त इच्छा आहे. मोठ्या प्रमाणात माझ्या माता, भगिनी, वयस्कर मंडळी, लेकरं तिथे श्रध्देने आले असतील, येत असतील तर त्यांची श्रद्धा व सुरक्षितता ही माझ्या दृष्टीने खूपमहत्त्वाची आहे. आदरणीय बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे माझ्या हृदयात आहेत
त्यामुळे मी माझ्या घरी आदरणीय बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याना वंदन करून मी पुर्ण होऊ देणार नाही आहे.
सैनिकांच्या शौर्याचे प्रतीक म्हणून त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ भीमा कोरेगावला उभारलेल्या
विजयस्तंभास मी पुन्हा एकदा विनम्र अभिवादन करतो.

आपला
चंद्रकांत पाटील