पुण्याच्या विकासासाठी काम मोदींसाठी मतदान करा – देवेंद्र फडणवीस

पुणे, ९ मे २०२४ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आर्थिक बळ दिल्यामुळे मेट्रो, एसटीपी, गरीबांना घरे,इलेक्ट्रिक बस असे विविध प्रकल्प मार्गी लागले. अनेक विकास कामांना गती मिळाली. म्हणूनच पुण्याचा विकास करणाऱ्या मोदी यांच्यासाठी एक खासदार निवडून देण्याचे काम आपण करायचे आहे.” अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहराच्या विकासाचा मुद्दा मतदारांसमोर मांडत भाजपला निवडून देण्याचे आवाहन केले.

महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी बाणेर येथील ताम्हाणे चौकात सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार प्रा. मेधा कुलकर्णी, भाजप नेते हर्षवर्धन पाटील,
शहरध्यक्ष धीरज घाटे, जगदीश मुळीक आदी उपस्थित होते. भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या “युवकांचे संकल्पपत्र” या पत्राचे अनावरण फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.

शहरीकरण म्हणजे शाप वाटायचा, त्यावेळी पंतप्रधान मोदी यांनी पहिल्यांदा शहराची काळजी घेतल्याचे फडणवीस यांनी सांगितले. ते म्हणाले, “पंतप्रधान मोदी यांनी पुण्यासाठी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी), पिण्याच्या पाण्यासाठी निधी, मेट्रोचे जाळे, इलेक्ट्रिक बस, गरीबांना घरे, स्मार्ट सिटी अशा विविध योजनांसाठी आर्थिक बळ दिले. सुनियोजित शहरासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्यामुळे देशातील सर्वोत्तम शहर बनण्याची ताकद पुणे शहरात निर्माण झाली आहे. २०१४ पासून पुणे शहर बदलले आहे. आता अजित पवार यांच्या माध्यमातून विमानतळ, रिंगरोड प्रकल्प तयार होऊन रोजगार निर्मिती होईल. “मॅन्युफॅकचरिंग आयटी हब” अशी शहराची वेगळी ओळख तयार होईल.”

मोदी सरकारच्या विविध योजनांचा जनतेला झालेला फायदा फडणवीस यांनी आकडेवारीसह मांडत विरोधकांवर निशाणा साधला, फडणवीस म्हणाले, “एकीकड नरेंद्र मोदी यांच्यासमवेत वेगवेगळया १८पक्षांची महायुती आहे. राहुल गांधी यांच्या समवेत २४ पक्षांची खिचडी आहे. त्यांच्याकडे पंतप्रधान पदाचा उमेदवार नाही. २४ नेते संगीत खुर्चीतून पाच वर्षे एक याप्रमाणे नेता निवडण्याचे काम करत बसतील. विरोधकांना पंतप्रधान मोदी यांच्यासमोर पर्याय उपलब्ध करता आलेला नाही. विरोधकांच्या इंजिनात कुटुंबातील व्यक्तींसाठी जागा आहे. मोदीजींच्या इंजिनात सर्वसामान्यांना जागा आहे.”