हिवाळी अधिवेशनात पुण्याच्या पदरी काहीच नाही

पुणे, 02 जानेवारी 2023 ः हिवाळी अधिवेशनात पुण्यातील पाणी पुरवठा, समाविष्ट गावांचा मिळकतकर, ४० टक्क्यांची सवलत, बीआरटी यासह १७ मुद्दे उपस्थित करून प्रश्‍न सोडविण्याचा प्रयत्न केला. पण राज्य सरकारकडून बघू, करू, माहिती घेतो अशी उत्तरे देऊन वेळ मारून नेली. एकाही विषयात ठोस निर्णय घेतला नाही. या अधिवेशनात शिंदे फडणवीस सरकारकडून शहराला काहीही मिळाले नाही, अशी टीका आमदार चेतन तुपे यांनी केली.

नागपूर येथे नुकतेच विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन झाले. त्यामध्ये केलेल्या कामासंदर्भात आमदार तुपे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.
तुपे म्हणाले, ‘‘हिवाळी अधिवेशनात एकूण १० दिवस कामकाज झाले. यामध्ये माझी १०० टक्के हजेरी लावली. स्थगन प्रस्ताव, तारांकित प्रश्‍न, अकारांकित प्रश्‍न, लक्ष्यवेधी, औचित्याचा मुद्दा या आयुधांचा वापर करून शहरातील व राज्यातील प्रश्‍नांवर आवाज उठवला. यामध्ये लोकायुक्त कायदा, राज्याचा संतुलित विकास, कात्रज चौकातील उड्डाणपुलाचे भूमिपूजन होऊन सव्वावर्ष उलटून गेला पण त्याला गती नाही, याच चौकात आता मेट्रो व इतर प्रकल्प आणले जाणार आहेत. त्यामुळे या चौकाचा इंटिग्रेटेड डीपीआर तयार केला पाहिजे अशी भूमिका अधिवेशनात मांडली, वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी अवजड वाहतूक शहराच्या आता येऊ देऊ नये ही भूमिका मांडली. बीआरटीची सेवा बंद करावी अशी माझी भूमिका नाही. पण स्वारगेट- हडपसर मार्गावर खूप कमी बीआरटी मार्ग शिल्लक आहे. त्यातच रस्त्याच्या मध्यभागातून सायकल ट्रॅक तयार केला आहे. त्याचा काहीही उपयोग होत नाही. बीआरटीची सेवा सुधारली पाहिजे अशी भूमिका मांडली. हडपसर विधानसभा मतदारसंघात अत्यंत कमी पाणी मिळत आहे. संपूर्ण शहरात समान पाणी पुरवठा करात यावा साठी मुळशी धरणातून पाच टीएमसी पाणी घ्यावे अशी मागणी अंतिम आठवडा प्रस्तावातून केली.
महापालिकेतील सुरक्षा रक्षकांसाठी ४५ वयाची अट लावल्याने अनेकांचे रोजगार गेल्याचा मुद्दा उपस्थित केला. पिंपरी चिंचवडप्रमाणे पुण्यात तीन पट दंड रद्द करावा, अतिवृष्टीत नुकसान भरपाई मिळाली नाही, सर्वांना समान पाणी द्यावे तसेच ४०टक्के सवतल काढून घेतली यात हस्तक्षेप करावा अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली. पण कोणत्याही विषयावर ठोस आश्वासन शिंदे फडणवीस सरकारने दिले नाही. राष्ट्रवादीच्या दोन्ही आमदारांनी आक्रमकपणे भूमिका मांडली. बाकी इतर आमदारांचे मूल्यमापन आम्ही करू इच्छित नाही, पण शहराला काही मिळाले नाही, असे तुपे यांनी सांगितले.