पैसे वाटपाचा आरोप म्हणजे सुळे बारामती हारणार – सुनील तटकरेंचा दावा

पुणे, 10 मे २०२४ : “बारामती लोकसभा निवडणुकीत आमच्या पक्षाने पैसे वाटप केले, असे म्हणणे हास्यास्पद आहे. याचाच अर्थ त्यांनी पराभवाची कबुली दिली.” अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षावर टिका करत “बारामतीची निवडणूक पवार विरुद्ध पवार अशी नसून पवार विरुद्ध सुळे अशी आहे, पवार हेच निवडून येणार” असा आत्मविश्वास ही व्यक्त केला.

पुणे लोकसभा निवडणूक तयारी आढावा घेण्यासाठी तटकरे यांनी गुरुवारी पुण्यात पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यानंतर तटकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी पक्षाचे शहराध्यक्ष दीपक मानकर, कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख, मिलिंद पवार, संजय मयेकर, पुष्कर तुळजापूरकर आदी उपस्थित होते.

बारामती लोकसभा निवडणुकीबाबत तटकरे म्हणाले, ” बारामती लोकसभा निवडणुकीवेळी माझी ही निवडणूक होती. त्यामुळे मी इकडे आलो नाही. दादा स्वतः सक्षम आहेत, त्यांनीच यापूर्वीच्या निवडणुका जिंकून दिल्या आहेत. या मतदार संघाचा दादांचा चांगला अभ्यास आहे. प्रफुल्ल पटेल यांनी स्वतः लक्ष घातले होते. निवडणुकीनंतर आढावा घेतला. ही निवडणूक पवार विरुद्ध पवार अशी नव्हती, तर पवार विरुद्ध सुळे अशी होती. त्यामध्ये पवार हे विजयी होतील.पैसे वाटप बाबतचा व्हिडिओ केव्हाचा आहे, त्याची सत्यता काय आहे, हे एकदा तपासून बघावे”

चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याबाबत तटकरे म्हणाले, ” आमच्या पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी स्वतः त्याविषयी आपली भूमिका स्पष्टपणे मांडली आहे. त्याविषयी अधिक बोलणे योग्य नाही. रुपाली चाकणकर यांनी भावनेच्या भरात ईव्हीएम मशीन पूजा केलेली असू शकते, त्यांच्याविरुद्ध गुन्हा देखील दाखल झालेला आहे. त्यांनी केलेली चूक ही चूकच आहे.”

आतापर्यंतच्या निवडणुकीबाबत तटकरे म्हणाले, “महायुती
तिसऱ्या‌ टप्प्यापर्यंत झालेल्या मतदानात महायुतीला मोठा पाठींबा मिळाला. राज्यस्तरावरील नेत्यांनी बुथ स्तरावर समन्वयाने काम केले. सुरूवातील समज गैरसमज होते, ते नंतर संपुष्टात आले. चौथ्या टप्प्यात मी पुणे, मावळ, शिरूर, नगर मध्ये फिरणार आहे. महायुतीला ४५ पेक्षा जास्त जागा नक्कीच मिळतील.”