बारसूमध्ये आंदोलक पोलिसांमध्ये झटापट, खासदार राऊतांना अटक

राजापूर, २८ एप्रिल २०२३ ः कोकणातल्या राजापूर येथील बारसूमधल्या प्रस्तावित रिफायनरीवरून मोठा वाद सुरू आहे. प्रकल्पाच्या माती परीक्षणाला स्थानिकांचा विरोध सुरू आहे. त्यामुळे या परिसराला छावनीचे स्वरूप आलेले असताना आज दुपारी आंदोलन आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. तर आंदोलकांना पाठिंबा देण्यासाठी गेलेले ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यामुळे या ठिकाणचा विरोध तीव्र होत असल्याचे दिसून येत आहे.

नाणार येतील रिफायनरीचा प्रकल्प रद्द झाल्यानंतर नवीन जागा बारसू येथे निश्‍चीत केली आहे. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना त्यांनी या जागेसाठी सहमती दर्शवत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्र लिहिले होते. बारसूमध्ये प्रत्यक्ष जागा पाहणी व माती परिक्षाचे काम गेल्या काही दिवसांपासून सूरू झाले असताना स्थानिक नागरिकांनी हा विनाशकारी प्रकल्प कोकणात नको अशी भूमिका घेऊन आंदोलन सुरू केले. त्यास ठाकरे गटाने पाठिंबा दिल्याने राज्यात पुन्हा एकदा भाजप विरुद्ध ठाकरे गट यांच्यातील वाद टोकाल गेला आहे.

या रिफायनरीच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या ग्रामस्थांचा विरोधात पोलीस बळाचा वापर करून प्रशासनाने मोडून काढला. तरीदेखील स्थानिकांचा विरोध सुरूच आहे. दरम्यान, शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊतही या आंदोलनात स्थानिकांच्या बाजूने उभे राहिले आहेत. या रिफायनरीविरोधात सुरू असलेल्या आंदोलनात सहभागी झालेल्या खासदार विनायक राऊत यांना आज अटक करण्यात आली. या अटकेची माहिती राऊत यांनी स्वतः ट्विटरवरून दिली आहे.

बारसूमध्ये तेलशुद्धीकरण प्रकल्पास विरोध करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांचे अमानुष अत्याचार सुरू असल्याचा आरोप करीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार विनायक राऊत यांनी ही दडपशाही थांबवून पोलीस फौजफाटा मागे घेण्याची मागणी बुधवारी केली होती. त्यानंतर ते या आंदोलनात सहभागी झाले. परिणामी आज त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
बारसू परिसरात परप्रांतीयांनी जमिनी खरेदी केल्या असून प्रकल्प झाल्यास भूमिपुत्रांचा नव्हे, तर परप्रातीयांचा फायदा होणार असल्याचे राऊत यांनी काल सांगितले होते. प्रकल्पाविरोधात ग्रामस्थांचा आज मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. यावेळी राऊत यांना अटक करण्यात आली.
दरम्यान, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे मे महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात बारसू परिसरातील पाच गावांमध्ये जाऊन स्थानिकांशी संवाद साधणार असल्याची माहिती राऊत यांनी काल दिली.

विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप