माझी छाती फाडली तर त्यात विखे पाटील दिसतील – अब्दुल सत्तार यांचे वक्तव्य

अहमदनगर, २८ एप्रिल २०२३: सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल कधीही लागण्याची शक्यता आहे. अशात महाराष्ट्रात मुख्यमंत्री बदलाच्या चर्चांना जोरदार उधाण आलं आहे. एकनाथ शिंदे यांच्याऐवजी राधाकृष्ण विखे-पाटील यांना लॉटरी लागण्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे शिंदे गटातील कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राधाकृष्ण विखे-पाटील यांना खूष करण्यासाठी भर सभेत ‘माझी छाती फाडून बघितली तरी त्यातही राधाकृष्ण विखे-पाटीलच दिसतील’, अस वक्तव्य करून टाकले. मात्र, अब्दुल सत्तार हे भावनेच्या भरात बोलून गेले असे सांगत विखे पाटील यांनी वेळ मारून नेली.

“जशी हनुमानाने छाती फाडून भगवान श्रीराम दाखवले, तशी माझी छाती फाडून दाखवली तर त्यामध्ये राधाकृष्ण विखे-पाटीलच दिसतील. विखे-पाटील मुख्यमंत्री काय त्यापेक्षा मोठे नेते व्हावेत, असं मला वाटतं. कुणाला नाही वाटत आपला मित्र मोठा व्हावा. मात्र, माझ्या मित्राला ( विखेंना ) अडचण होईल, असं प्रश्न त्यांना विचारू नका. मी सुद्धा अशा प्रश्नांना उत्तर देणार नाही,” असं अब्दुल सत्तार यांनी सांगितलं होतं.
यावर आता राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले, “अब्दुल सत्तार माझे जवळचे मित्र असून, भावनिक आहेत. भावनेच्या भरात ते बोलले आहेत. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली आम्ही उत्तमरित्या काम करत आहोत. मुख्यमंत्री बदलणे किंवा त्याबद्दल दावा करण्याची चर्चा व्यर्थ आहेत,” अशी स्पष्टोक्ती राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिली.

हनुमानाचं नाव घेण्याचा अधिकार सत्तारांना नाही – दानवे
“अब्दुल सत्तारांच्या पोटातलं ओठावर आलं आहे. त्यांच्या पोटात शिजत असेल, ते सत्तारांनी बोलून दाखवलं. कुंकू एकाचं लावायचं, लग्न एकाबरोबर करायचं आणि राहायचं एकाबरोबर अशी परिस्थिती सत्तार यांची झाली आहे. हनुमानाचं नाव घेण्याचा अधिकार सत्तारांना नाही. त्यांच्या छातीत खूपजण निघतील,” असा टोला विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना लगावला आहे.

विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप