भावी मुख्यमंत्री म्हणून फ्लेक्स लावू नका – अजित पवारांनी कार्यकर्त्यांना खडसावले

पुणे, २८ एप्रिल २०२३ : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार पुढचे मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चांना जोर आला आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्त्यांकडून असा प्रचार सुरू झाल्याने अनेक ठिकाणी भावी मुख्यमंत्री म्हणून अजित पवारांचे बॅनर लागले आहेत. त्यावरून चर्चा सुरू असतानाच अजित पवार यांनी मात्र आज कार्यकर्त्यांना चांगलीच खडसावले. भावी मुख्यमंत्री म्हणून माझ्या नावाचे फिक्स लावू नका. त्यासाठी आधी राष्ट्रवादीचे आमदारांची संख्या वाढवा असा सल्ला दिला.
आज ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते.

असे बॅनर्स अजिबात लावण्यात येऊ नये. आमच्या कार्यकर्त्यांच्या चुकीच्या पद्धतीची अपेक्षा आहे. असे बॅनर लावून कोणीही मुख्यमंत्री बनत नसतं. त्यासाठी १४५ ची मॅजिक फिगर लागते. एकनाथ शिंदेंनी वेगवेगळ्या कृल्प्त्या वापरून मॅजिक फिगर मिळवली. कोणालाच वाटलं नव्हतं ते मुख्यमंत्री बनतील. परंतु, मी तर सगळ्यांना आवाहन करतो, माझ्या राष्ट्रवादीतील नेते, कार्यकर्ते आणि हितचिंतकांना. सासुरवाडीमध्ये माझ्यावर प्रेम उतू चालणाऱ्या सहकाऱ्यांनाही आवाहन करतो की अतिशय चुकीचा आग्रह आहे. आपआपलं काम करा. आमदारांची संख्या वाढवा, तुमच्या विचारांचे आमदार निवडून आले, वरिष्ठांचे आशीर्वाद लाभले आणि आमदारांनी पाठिंबा दिला तर होऊ शकतं, असं अजित पवार म्हणाले.

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे धाराशिव जिल्ह्यातील तेरई या गावाचे गावकरी आहेत. अजित पवारांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा बोलून दाखवतात तेरई गावात अजित पवार राज्याचे भावी मुख्यमंत्री असे बॅनर झळकले आहेत. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचं माहेर धाराशिव आहे. अजित पवार यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा बोलून दाखवताच त्यांच्या सासुरवाडीच्या ग्रामस्थांनी संत गोरोबाकाकांना साकडं घातलं आहे. अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत म्हणून हे साकडं घालण्यात आलं आहे.

बारसूबाबत स्पष्ट केली भूमिका

बारसू येथील रिफायनरीला विरोध करण्यासाठी नागरिकांनी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. त्या आंदोलकावर लाठीचार्ज झाल्याची घटना घडली आहे. त्या प्रश्नावर अजित पवार यांनी भूमिका मांडली. यावेळी अजित पवार म्हणाले की, “बारसू येथील रिफायनरी प्रकल्पाबाबत पालकमंत्री उदय सामंत यांनी शरद पवार यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. तसेच माझे देखील उदय सामंत यांच्यासोबत बोलणे झाले आहे. त्या प्रकल्पामुळे तेथील गावांचा किंवा पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही. अनेकांना रोजगार उपलब्ध होणार आहे, याबाबत उदय सामंत यांनी सांगितले आहे. पण तेथील नागरिक जर विरोध करत असतील तर त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे. त्यामुळे शंकांचे निरसन होईपर्यंत सर्वेक्षण थांबवले पाहिजे”, अशी माझी भूमिका आहे. तसेच “गरज पडल्यास मी देखील आंदोलनकर्त्यांची भेट घेण्यास जाईल”, अशी भूमिका देखील त्यांनी मांडली.

 

विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप