‘आपले खासदार होणार चारशे चार’ – रामदास आठवले यांचा आत्मविश्वास

पुणे, ३० डिसेंबर २०२३: “भाजप आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) विकासाच्या मुद्द्यावर काम करत आहेत. त्यामुळे येत्या लोकसभा निवडणुकीत आपले ४०४ खासदार निवडून येतील”, असा आत्मविश्वास केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शुक्रवारी व्यक्त केला. ‘आता आपले खासदार होणार चारशे चार, कारण इंडियाच्या नावाने बोगस काम करणार्‍यांवर मी करणार आहे वार’, अशा खास काव्यमय शैलीत आठवले यांनी विरोधकांवर निशाणा साधला.

‘माय होम इंडिया’ संस्थेतर्फे मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या १२३ जयंतीनिमित्त कला साधकांना आठवले यांच्या हस्ते ‘भारतरत्न लता मंगेशकर स्मृती पुरस्कार’ प्रदान करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी प्रसिद्ध गायक सुदेश भोसले, माय होम इंडिया संस्थेचे सुनील देवधर उपस्थित होते.

या कार्यक्रमात शर्वरी जमेनीस, सावनी शेंडे, श्रद्धा गायकवाड, सौरभ काडगावकर, नंदकुमार भांडवलकर, अनुजा बोरुडे-शिंदे, पंढरीनाथ कोंडे, पोपट ढमाळ, होनराज मावळे, आनंद देशमुख, सुरमणी मिलिंद तुळाणकर, प्रमोद मराठे, संतोषकुमार मोरे, मंदार परळीकर आणि श्रीपाद ब्रह्मे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.

आठवले म्हणाले, “माझा पक्ष छोटा आहे, पण छोटे पक्षच मोठे होत असतात. भाजपही एकेकाळी लहान पक्ष होता, त्यांचे देशात केवळ दोन खासदार होते. पण आता भाजप सर्वात मोठा पक्ष झाला आहे. माझ्या पक्षाचा एकही खासदार नसताना मी केंद्रीय मंत्री आहे. माझ्या मंत्रीपदाला धोका नाही.” परदेशातही भारतीय मोठ्या संख्येने आहेत, त्यामुळे जगभरात सर्वत्र लता मंगेशकर यांची गाणी ऐकली जातात, असेही आठवले यांनी नमूद केले.

“मी बुद्धिस्ट आहे, पण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्व जाती-धर्मांचा आदर करण्यास सांगितले आहे. त्यामुळे राम मंदिर उद्घाटनाच्या कार्यक्रमाचे मला अद्याप निमंत्रण मिळालेले नाही. पण निमंत्रण मिळाल्यास मी नक्की जाईन”, असे रामदास आठवले यांनी सांगितले.