फडणवीसाच्या इशाऱ्यानंतर जरांगे पाटलांनी मागितली माफी

मुंबई, २७ फेब्रुवारी २०२४ ः जरांगे पाटील माझ्याबद्दल जे काही बोलले, त्यानंतर मराठा समाज त्यांच्यामागे नव्हे तर माझ्यामागे उभा राहिला आहे. दु:ख या गोष्टीचं आहे की अशाप्रकारे कुणीही कुणाची आई-बहीण काढेल. आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव सांगतो. कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला परत पाठवणारे छत्रपती होते. पण त्यांचं नाव घेऊन लोकांच्या आयाबहिणी काढायच्या? पण माझी त्यांच्याविषयी तक्रारच नाहीये. त्यांच्यामागे कोण आहे हे शोधावंच लागेल” असा इशारा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केले. त्यानंतर मात्र, मनोज जरांगे पाटील यांनी मी आई बहिणीवरून शिव्या दिल्या असतील तर माफी मागतो असे म्हणत एक पाऊल मागे घेतो.

मराठा आरक्षणासाठी लढणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटी येथे आयोजित पत्रकार परिषदेतून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले होते. या आरोपांचे पडसाद राजकीय वर्तुळात उमटले. विरोधकांनी यावरून सत्ताधाऱ्यांवर टीकाही केली. देवेंद्र फडणवीस मला विष देऊन किंवा इतर मार्गांनी मारणार असल्याचा आरोप करत मनोज जरांगे पाटील यांनी फडणवीसांना इशारा दिला की, मीच मुंबईत सागर बंगल्यावर (उपमुख्यमंत्र्यांचं निवासस्थान) येतो. परंतु, आंदोलक आणि समर्थकांनी समजूत काढल्यानंतर मनोज जरांगे यांनी मुंबईला जाण्याऐवजी बेमुदत उपोषण साखळी उपोषणात रुपांतरीत करण्याचा निर्णय जाहीर केला. तसेच, त्यांनी उपचारही घेतले. या सर्व आरोप-प्रत्यारोपांचे आज (२७ फेब्रुवारी) विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पडसाद उमटले. अधिवेशनादरम्यान, सभागृहात मोठा गदारोळ झाल्याचं पाहायला मिळालं. भाजपा आमदार आशिष शेलार यांनी मागणी केल्यानंतर जरांगेंचं आंदोलन आणि त्यांचे आरोप यांची एसआयटी चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील आपली भूमिका सभागृहासमोर मांडली आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सभागृहात म्हणाले, “मनोज जरांगेंच्या विषयावर बोलायची माझी इच्छा नव्हती. पण तरी विषय निघालाच आहे तर काही गोष्टी सांगितल्या पाहिजेत असं मला वाटतं. या सभागृहाला आणि महाराष्ट्राला मराठा समाजासाठी मी काय केलंय हे पूर्णपणे माहिती आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील माझ्याबद्दल जे काही बोलले, त्यानंतर मराठा समाज त्यांच्यामागे नव्हे तर माझ्यामागे उभा राहिला आहे. दु:ख या गोष्टीचं आहे की अशाप्रकारे कुणीही कुणाची आई-बहीण काढेल. आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव सांगतो. कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला परत पाठवणारे छत्रपती होते. पण त्यांचं नाव घेऊन लोकांच्या आयाबहिणी काढायच्या? पण माझी त्यांच्याविषयी तक्रारच नाहीये. त्यांच्यामागे कोण आहे हे शोधावंच लागेल”
फडणवीस यांनी थेट विधानसभेतून टीका केल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. मनोज जरांगे पाटील म्हणाले, आंदोलन चालू असताना असं काहीतरी अनावधानाने होतं. आमचं बेमुदत उपोषण आहे. त्यावेळी ते अनावधानाने झालं असेल. मी कोणालाही आई-बहिणीवरून शिव्या दिल्या नसतील. मी शिव्या दिल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो. देवेंद्र फडणवीस विधानसभेत बोलले की मी आई-बहिणीवरून शिव्या दिल्या. त्यांनी विधानसभेच्या पटलावर ही गोष्ट मांडली असं मी ऐकलं आहे. त्यामुळे मी एवढंच सांगेन की, मी आई-बहिणीवरून बोललो असेन आणि ती गोष्ट फडणवीसांना लागली असेल तर मी त्या शब्दांबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. केवळ ते शब्द मागे घेतो.

मनोज जरांगे पाटील म्हणाले, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्र्यांबद्दल असे शब्द निघाले असतील तर मी ते शब्द मागे घेतो. त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. आई बहिणीपेक्षा आम्हाला दुसरं काहीच मोठं नाही. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने चालणारे लोक आहोत. त्यांच्या विचारांचा वारसा पुढे घेऊन निघालो आहोत. त्यामुळे अनावधानाने कोणाच्याही आई-बहिणीवरून तोंडून काही चुकीचे शब्द गेले असतील तर मी १०० टक्के ते शब्द मागे घेतो आणि दिलगिरी व्यक्त करतो.” मनोज जरांगे पाटील छत्रपती संभाजीनगर येथे टीव्ही ९ मराठीशी बोलत होते.