फडणवीस यांनी कानात बोळे घातलेत का ? चर्चेला या कोणी अडवणार नाही – जरांगे पाटील यांची टीका

मुंबई, २८ ऑक्टोबर २०२३: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषण सुरू केले आहे. आज त्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे. आज त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत राज्य सरकारला स्पष्ट शब्दांत इशारा दिला. मनोज जरांगे पाटील यांची तब्बेत दिवसेंदिवस खालावत चालली आहे. प्रसारमाध्यमांशी बोलतेवेळी त्यांचा हातही थरथरत होता. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी आज किंवा उद्या चर्चेसाठी यावं. सरकारशी अद्याप कोणताच संवाद झालेला नाही. त्यांना विचारलेल्या प्रश्नांची उत्तरेही मिळालेली नाहीत. दोन दिवसांत आरक्षण मिळेल असे जर तानाजी सावंत म्हणत असतील तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री असे का म्हणत नाहीत?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

प्रसारमाध्यमांच्या कॅमेऱ्यासमोर चर्चा होत नसते समोरासमोर येऊन चर्चा केली पाहिजे असे वक्तव्य फडणवीस यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्यावर जरांगे पाटील यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. मग मी काल काय म्हणालो होतो. तुम्ही चर्चेला या मराठे तुम्हाला अडवणार नाहीत. फडणवीसांच्या कानात काय बोळे घातले आहेत का? असा सवाल करत आरक्षण द्यायचे की नाही एकदाच काय ते सांगून टाकायचे बाकीची वळवळ करायची नाही, असे जरांगे पाटील म्हणाले.

सरकारचं कोणतंही उत्तर मिळालं नाही अथवा संवाद नाही. 30-31 ऑक्टोबरपर्यंत आम्ही वाट पाहू. सरकारला माणुसकी समजत नाही आम्ही त्यांना उत्तर देऊ, असा इशारा जरांगे पाटलांनी दिला.