विधानभवनात फडणवीस- ठाकरे यांचा एकत्र प्रवेश; ३ वर्षांनी दोन्ही नेते दिसले सोबत

मुंबई, २३ मार्च २०२३ : विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा  शेवटचा आठवडा सुरु आहे. अनेक विषयांवर या अधिवेशनात चर्चा झाली, तसेच अनेक महत्वपूर्ण निर्णय देखील जाहीर करण्यात आले. मात्र या अधिवेशनाचा आजचा दिवस हा एका वेगळ्या कारणासाठी चर्चेत आहे. ते कारण म्हणजे, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे एकत्र विधानभवनात दाखल झाले. या दोन्ही नेत्यांची एकत्र एन्ट्री झाल्याने हा सर्वांच्याच चर्चेचा विषय ठरला. विशेष म्हणजे, दोन्ही नेते एकमेकांसोबत हसतमुखाने संवाद करत विधानभवान दाखल झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी त्यांच्यासोबत आदित्य ठाकरे देखील उपस्थित होते.

2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर उद्धव ठाकरे यांनी भाजपची साथ सोडली होती. त्यानंतर महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं होतं. या दोन्ही नेत्यांमध्ये दुरावा निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळाले होते.यानंतर उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस या दोन्ही नेत्यांनी ऐकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले होते. यावरुन दोन्ही पक्षात काहीसा तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर जून 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांसह शिवसेनेत बंड केलं. यामुळे शिवसेनेत उभी फूट पडली होती. त्यानंतर राज्यात शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आले. यावेळी मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. यानंतर यामागचे कलाकार देवेंद्र फडणवीस असल्याची कबुली एकनाथ शिंदे यांनी सभागृहात दिली होती. त्यानंतरही उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी ऐकमेकांवर टीका केली होती. या एकूणच तणापूर्ण वातावरणाच्या पार्श्वभूमीवर तब्बल ३ वर्षांनी हे दोन्ही नेते पुन्हा एकदा एकत्र दिसले. त्यामुळेच राजकीय वर्तुळात हा चर्चेचा विषय बनला.

विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप