एकवेळ फडणवीस-ठाकरे एकत्र येतील… पण तटकरे-गोगावलेंचे सूर जुळणे अशक्य!

मुंबई, २८ जानेवारी २०२५: असं म्हणतात की राजकारणात कोणचं कुणाचा कायमचा शत्रू नसतं आणि कोणचं कुणाचं कायमचं मित्र नसतं. त्यामुळेच उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची गाठ-भेट होते, सामना वृत्तपत्रातून फडणवीस यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतो. पण या उक्तीला अपवाद आहे तो रायगडचा. रायगडमध्ये खासदार सुनील तटकरे, मंत्री आदिती तटकरे आणि मंत्री भरत गोगावले यांचे सूर जुळणे जवळपास अशक्य आहे.

रायगड जिल्ह्यात आदिती तटकरे आणि भरत गोगावले यांच्यातील वादाचा पाढा सुरूच आहे. आताही पालकमंत्रीपदावरून या दोघांमध्ये टोकाचे वाद पाहायला मिळत आहेत. दोघांनीही पालकमंत्रिपद हा प्रतिष्ठेचा मुद्दा केला आहे. पण या दोघांमधील वादाचा हा पहिलाच अंक नाही. मागच्या सहा वर्षांपासून दोघांमध्ये सातत्याने कोणत्या ना कोणत्या कारणावरून जुंपली आहे. रायगड जिल्ह्याला आपल्या अधिपत्याखाली ठेवण्यासाठीच दोघांचीही धडपड दिसत आहे.

सुनील तटकरे आणि भरत गोगावले हे दोघेही वेगवेगळ्या पक्षांमधील आणि वेगवेगळ्या आघाड्यांमधील नेते होते. त्यामुळे दोघांमधील सत्तेचा कलगीतुरा कधी रंगला नव्हता. पण या दोघांमधील संघर्ष रायगडला नवीन नाही. शिवसेनेला रायगडमध्ये रोखण्याचे, चेपवण्याचे काम तटकरे यांनी केले. त्यामुळे सेनेच्या बहुतांश आमदारांचा त्यांच्यावर आधीपासून राग होताच. अशात महाविकास आघाडी सरकारमध्ये या दोघांच्याही तलवारी एकाच म्यानात आल्या आणि वादाच्या ठिणग्यांना सुरूवात झाली. पहिल्यांदाच आमदार झालेल्या आदिती तटकरे यांची राज्यमंत्री पदावर वर्णी लागली होती. तर तीन वेळा आमदार होऊनही शिवसेनेच्या भरत गोगावले यांना मंत्रीमंडळात स्थान मिळाले नव्हते. त्यामुळे गोगावले नाराज होते.

जिल्ह्यात शिवसेनेचे तीन आमदार असल्याने जिल्ह्याचा पालकमंत्री हा शिवसेनेचा असावा असा आग्रह तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे लावून धरला होता. मात्र उध्दव ठाकरे यांनी तो न जुमानता आदिती तटकरे यांच्याकडे पालक मंत्री पदाची सुत्रे दिली. इथेच या वादाची पहिली ठिणगी पडली होती. नंतर कधी निधी वाटपावरून, कधी श्रेयवादावरून, तर कधी शिवसेना आमदारांच्या मतदारसंघात ढवळाढवळ करण्यावरून वाद होत राहिले.