माझा अंत बघू नका- मुख्यमंत्र्याचा विरोधकांना इशारा

मुंबई, २३ ऑगस्ट २०२२:- अधिवेशनकाळात विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करणाऱ्या विरोधी पक्षाच्या आमदारांकडून करण्यात आलेली घोषणाबाजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जिव्हारी लागली आहे. नुकतेच शेतकऱ्यांना मदतीबाबत दिलेल्या उत्तरात शिंदे यांनी विरोधकांना पुन्हा एकदा इशारा दिला.

 

तुमच्या चिठ्ठयापाट्या माझ्याजवळ आहेत, पण मी कोणाच्या उगागच मागे लागणार नाही. किती सहन करायचे यालाही मर्यादा असतात. माझा अंत बघू नका, अशा शब्दांत मुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधकांना सुनावले. हा इशारा नाही हे सांगण्यासही ते विसरले नाहीत. आमदार धनंजय मुंडे यांना उद्देशून मुख्यमंत्री शिंदे यांनी दया, प्रेम, करुणा दाखविली जाणार नाही, असे सुनावले होते. त्याबद्दल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी नापसंती व्यक्त केली. बोलताना मर्यादा पाळायल्या हव्यात, असेही मत त्यांनी व्यक्त केले.