ओवेसी बंधू दळिद्री ;राज ठाकरे यांची टीका

मुंबई, २३ आॅगस्ट २०२२:मुंबईत पक्ष पदाधिकाऱ्यांच्या कार्यक्रमात भाषण करताना राज ठाकरेंचं विधान

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईमध्ये पक्ष कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ओवेसी बंधूंवर टीका केली आहे. ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहाद उल मुस्लिमीन म्हणजेच एमआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी आणि त्यांचे बंधू अकबरुद्दीन ओवेसी यांनी हिंदू देवीदेवतांचा अपमान केल्याचा आरोप करत राज ठाकरेंनी, “या लोकांच्या जीभेवर कोणत्याही प्रकारची बंधनं घालण्यासाठी कोणतेही सरकार तयार नाही,” अशी टीका केली आहे.

 

राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना, “आजपर्यंत आपण जेवढी आंदोलनं केली तेवढी इतर कोणत्याही पक्षाने केलेली नाहीत,” असं म्हटलं. पुढे राज यांनी, “मशिदीवरचे भोंगे काढा भोंगे काढा किती वर्ष सुरु होतं. पण या भोंग्यांना आपण पर्याय दिला. एक तर भोंगे काढा किंवा आम्ही तिथे येऊन हनुमान चालिसा म्हणू. सगळ्यांनी भोंगे काढायला सुरुवात केली. आता मुस्लीम समाजातील अनेकजण सांगत आहेत की ते बरं वाटतं कानाला. असंख्य आंदोलनं झालेली आहेत. तुम्ही हे लोकांना सतत सांगितलं पाहिजे. तुम्ही कसले दबून राहता?” असा सवाल केला.

 

पुढे याच संदर्भातून राज यांनी नुपूर शर्मांसंदर्भातील वादावर भाष्य केलं. “त्या नुपूर शर्मा बोलल्या. त्यांना काढून काय टाकलं. माफी काय मागितली सगळ्यांची. मी बाजू घेतली त्यांची. त्या स्वत:च्या मनातलं बोलत नव्हत्या. जे होतं ते (बोलत होत्या)”, असं म्हणत राज यांनी नुपूर शर्मांच्या विधानाचं समर्थन केलं आहे. तसेच पुढे राज यांनी भारतामधून फरार झालेला मुस्लिम धर्मोपदेशक आणि इस्लामिक रीसर्च फाउंडेशनचा संस्थापक झाकीर नाईकचा उल्लेख केला. “तुमचा तो नाईक कोण? झाकीर नाईक त्याची मुलाखत बघा. झाकीर नाईक तर मुस्लीम आहे. झाकीर नाईकच्या एका मुलाखतीत त्याने तेच सांगितलं आहे जे नुपूर शर्मा बोलत होती,” असंही राज भाषणामध्ये म्हणाले. “झाकीर नाईकच्या बाबतीत काही नाही झालं त्याच्याबद्दल कोण काही बोललं नाही. त्याला कोणी सांगितलं नाही माफी मागा. ते बोलणं सोडून दिलं तुम्ही,” असं म्हणत राज यांनी नाराजी व्यक्त केली.

 

याचसंदर्भातून पुढे त्यांनी ओवेसी बंधूंवर निशाणा साधला. “हरामखोर दोन भाऊ ते ओवेसी. त्यातला एकजण आमच्या देवीदेवतांबद्दल बोलतो. क्या नाम हैं उनके ‘गणपती, लक्ष्मी वगैरे वगैरे…’ शेवटचं काय बोललाय तो वाक्य. कैसे नाम रखते है ये,” असं म्हणत राज यांनी आपला आक्षेप नोंदवला. यावेळी राज यांनी ओवेसी बंधूंपैकी एकाने गणपती आणि लक्ष्मीचा उल्लेख करत असं म्हटल्याचा दावा केला. “त्याला कोणी माफी मागायला नाही सांगणार या देशात. या देशात चांगले मुस्लमान देखील झाले आणि आहेत. यांच्यासारखे (ओवेसी बंधूंसारखे) दळिद्री नाहीत. मात्र यांना कोणत्याही प्रकारचं सरकार कोणत्याही प्रकारचा चाप घालायला तयार नाही. यांच्या जीभेवर कोणत्याही प्रकारची बंधनं आणायला तयार नाहीत,” अशा शब्दांमध्ये राज यांनी आपला संताप व्यक्त केला.

 

राज यांनी ‘सारे जहाँ से अच्छा’ या गाण्याचा संदर्भ देत आपण देशाचं नावं हिंदुस्तान असं घेतलं पाहिजे असंही म्हटलं. “कवी इक्बाल या माणासाने लिहिलेल्या काव्यामध्ये तो भारत नाही म्हणत आहे. तो काय म्हणतोय तर, सारे जहाँ से अच्छा ये हिंदुस्तान हमारा. हे हिंदूचं स्थान आहे. हे तो कवी म्हणतोय आणि आम्ही हिंदू या देशाला भारत म्हणतोय. आम्ही बोलताना बोलत पण नाही की, आम्ही हिंदुस्तानात आहोत. आमच्या भारतात म्हणतो आपण. नाहीतर अगदी सोप इंडिया,” असं म्हणत राज यांनी आपली नाराजी व्यक्त केली.