माझ्याकडे पक्षाची निशाणी नसली, तरी फरक पडत नाही : राज ठाकरे

मुंबई, २३ ऑगस्ट २०२२: गेल्या दोन महिन्यात राज्यात घडलेल्या सत्तानाट्यामुळे अनेक नवे प्रश्न निर्माण झाले आहेत. तसेच, सत्तेची समीकरणं देखील मोठ्या प्रमाणावर बदलली आहेत. एकनाथ शिंदे यांच्या गटाची बंडखोरी आणि त्यानंतर सत्तेत सामील होण्याच्या निर्णयामुळे नेमकी खरी शिवसेना कोणती? शिवसेनेचं निवडणूक चिन्ह असेलल्या धनुष्यबाणावर कुणाचा हक्क असेल? असे मुद्दे उपस्थित झाले आहेत. त्यासंदर्भात प्रकरण थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचलं असून येत्या २५ ऑगस्ट रोजी यासंदर्भात ५ सदस्यीय घटनापीठासमोर सुनावणी होणार आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आज मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पक्ष पदाधिकाऱ्यांसमोर केलेल्या भाषणात टोलेबाजी केली आहे. यातून राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंनाच टोला लगावल्याचं बोललं जात आहे.

 

२०१९ला नेमकं काय घडलं होतं?

हिप बोन शस्त्रक्रिया झाल्यानंतर बराच काळ राज ठाकरे सार्वजनिक आयुष्यापासून लांब होते. बऱ्याच काळानंतर आज राज ठाकरेंनी केलेल्या भाषणात चौफेर टोलेबाजी केली. यावेळी २०१९ साली मुख्यमंत्रीपदाची मागणी केल्यावरून उद्धव ठाकरेंवर त्यांनी टीकास्त्र सोडलं. “२०१९ला निवडणुका झाल्यानंतर शिवसेना-भाजपानं फारकत घेतली. का? तर म्हणे अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाबाबत ठरलं होतं. मला अजूनही आठवतंय. मला माहिती आहे. कारण बाळासाहेब असताना झालेल्या त्या बैठकांमध्ये मी होतो. बाळासाहेब ठाकरे, मनोहर जोशी, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे असे बरेच जण होते. तिथे पहिल्यांदा ती गोष्ट ठरली की ज्याचे जास्त आमदार, त्याचा मुख्यमंत्री. जर ही गोष्ट तुमच्यात ठरली आहे, तर २०१९ला तुम्ही मुख्यमंत्रीपदाची मागणी करूच कशी शकता?”, असा सवाल राज ठाकरेंनी केला.

 

दरम्यान, भाषणाच्या शेवटी राज ठाकरेंनी केलेल्या टोलेबाजीचा रोख उद्धव ठाकरेंच्या दिशेनंच असल्याचं बोललं जात आहे. पक्षाचं चिन्ह आणि पक्षाचं नाव यासाठी शिवसेना न्यायालयीन लढा देत असताना त्यासंदर्भात राज ठाकरेंनी विधान केलं आहे.

 

“माझ्या आजोबांचा, बाळासाहेब ठाकरेंचा विचार मला पुढे न्यायचा आहे. माझ्याकडे निशाणी असली काय, नसली काय.. नाव असलं काय, नसलं काय.. याने मला काही फरक पडत नाही. माझ्याकडे विचार आहे. सगळ्यात मौल्यवान गोष्ट कुठली असेल, तर ती म्हणजे ते विचार आहेत. बाकीचं सगळं सोडा, पण त्या बाबतीत मी श्रीमंत आहे. महाराष्ट्रात ज्या लोकांनी, महापुरुषांनी जे विचार पेरले, ते ऐकणं, वाचणं, त्यातून बोध घेणं, महाराष्ट्र समजून घेणं ही गोष्ट प्रत्येकानं करणं गरजेचं आहे”, असं राज ठाकरे म्हणाले.

 

“तडजोड करून निवडणुका लढवू नका”

 

यावेळी बोलताना राज ठाकरेंनी मनसे पदाधिकारी आणि नेतेमंडळींना कानपिचक्या दिल्या. “आपल्याला ताकदीने आणि हिंमतीने या निवडणुका लढवायच्या आहेत. माझी हात जोडून विनंती आहे, तडजोड करून निवडणुका लढवू नका. नुसते लाचार होऊन निवडणुका लढवू नका. शून्य किंमत राहील तुम्हाला. माझे एवढे घे, तुझे एवढे घे वगैरे. यातून तुम्ही तुमची किंमत शून्य करून घेता. या गोष्टी लपून राहात नाहीत. या बाहेर येतातच”, असं राज ठाकरे म्हणाले.