‘कोरेगाव भीमा दंगल प्रकरणात संभाजी भिडेचा मोठा रोल’ – प्रकाश आंबेडकर यांचा पुन्हा एकदा आरोप

पुणे, ३० ऑगस्ट २०२३: कोरेगाव भीमा दंगल प्रकरणात शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडेचा मोठा रोल असल्याचा जबाब वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी भीमा कोरेगाव चौकशी आयोगासमोर दिला आहे. १ जानेवारी २०१८ रोजी पुण्यातील भीमा कोरेगाव विजयस्तंभ परिसरात मोठा हिंसाचार घडला होता. या प्रकरणी नेमण्यात आलेल्या चौकशी आयोगाने प्रकाश आंबेडकरांना आज जबाब नोंदवण्यासाठी बोलावलं होतं. आयोगासमोर तब्बल अडीच तास झालेल्या चौकशीत प्रकाश आंबेडकरांनी संभाजी भिडेचा रोल असल्याचं सांगितलं आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले, ज्या दिवशी भीमा कोरेगाव परिसरांत हिंसाचार घडला, त्या घटनेच्या आधी सांगलीतून काही लोकं पुण्यात आली होती. त्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे भीमा कोरेगाव परिसरात हिंसाचार झाला. दंगलीच्या दिवशी परिसराच्या 20 किमी अंतरावरील लोकांचे कॉल डिटेल्स तपासले पाहिजेत, तसेच सांगलीवरुन आलेल्या लोकांनी भीमा कोरेगाव ठिकाणी भेट दिली की नाही? याबाबत चौकशी झाली पाहिजे, असंही ते म्हणाले आहेत.

फडणवीसांना दंगलीची माहिती नव्हती :
ज्या दिवशी दंगल घडली त्या दिवशी राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अहमदनगर जिल्ह्यात होते. 1११.४० ला त्यांचं हेलिकॉप्टर टेक ऑफ झाल्याची नोंद आहे, जर फडणवीसांना दंगलीची माहिती मिळाली असते तर त्यांनी पुण्यात येऊन आढावा घेतला असता, पण त्यांना माहिती मिळालीच नसल्याचं प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत. दरम्यान, ज्या लोकांनी भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणाची माहिती दाबली त्यांचीही चौकशी झाली पाहिजे, यावेळी उलट चौकशीत मला अनेक प्रश्न विचारण्यात आले असून छत्रपती संभाजी महाराजांचं दफन कोणी केलं? यावरुन हिंसाचार घडल्याचं दिसून येत असल्याचं प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केलं आहे.

पुण्यातील कोरेगाव भीमा १ जानेवारी २०१८ रोजी पुण्याजवळील कोरेगाव भीमा येथे हिंसाचार झाला. या घटनेचे पडसाद नंतर महाराष्ट्राच्या राजकारणावरही पडले होते. या हिंसाचाराप्रकरणाच्या चौकशीसाठी राज्य सरकारने न्यायमूर्ती जे. एन. पटेल यांच्या अध्यक्षतेखाली एक आयोग नेमला होता.