अजित पवार राष्ट्रवादीचा प्रचार करणार – छगन भुजबळ

मुंबई, ३१ जुलै २०२३: भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अजित पवार कमळाचा प्रचार करणार असा दावा केला. त्यावर अजित पवार गटाने मंत्री छगन भुजबळ यांनी प्रत्युत्तर देत बावनकुळे यांना टोला लगावला. “सगळं काही दिसतंय, त्यांना पुढचं दिसतंय. बावनकुळे पंडित कधीपासून झाले हेच मला काही कळत नाही. अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत, तसेच ते उपमुख्यमंत्री आहेत. त्यामुळे ते राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार करतील.”असे भुजबळ म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी महिन्याभरापूर्वी पक्षात बंडखोरी करून वेगळा गट स्थापन केला. राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांना बरोबर घेत अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरच दावा केला. तसेच या नेत्यांसह त्यांनी महायुतीत प्रवेश केला आणि ते सत्तेत सहभागी झाले. अजित पवार हे सध्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून कारभार पाहत आहेत. तर त्यांच्या गटातील आठ आमदार मंत्री झाले आहेत. अजित पवारांचा गट आता एनडीएचा अधिकृत सदस्य असून अजित पवार, प्रफुल्ल पटेल एनडीएच्या बैठकांमध्ये सहभागी होत आहेत. अशातच, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीचा सदस्य म्हणून निवडणुका लढेल असं बोललं जात आहे.

दरम्यान, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. बावनकुळे यांनी परभणीतल्या पाथरी येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, आगामी लोकसभा निवडणुकीत अजित पवार हे कमळाचा प्रचार करतील. बावनकुळे यांच्या या वक्तव्यामुळे वेगवेगळ्या राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत. त्याचबरोबर बावनकुळे म्हणाले, आम्हीसुद्धा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार करू

चंद्रशेखर बावकुळे यांच्या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. काही वेळापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातील ज्येष्ठ नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी प्रसारमाध्यमांशी बातचित केली. यावेळी भुजबळ यांनी बावकुळेंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली. छगन भुजबळ म्हणाले, बावनकुळेंना सगळं काही दिसतंय, त्यांना पुढचं दिसतंय. बावनकुळे पंडित कधीपासून झाले हेच मला काही कळत नाही. अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत, तसेच ते उपमुख्यमंत्री आहेत. त्यामुळे ते राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार करतील.