अजित पवार नेहमीच खरे बोलतात – जयंत पाटील यांचा चिमटा

पुणे, ३०सप्टेंबर २०२३: राष्ट्रवादी कॉंग्रेस कोणाची, याची सुनावणी निवडणूक आयोगाने ६ ऑक्‍टोबर रोजी होणार आहे. त्यातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यापूर्वी केलेल्या एका वक्तव्यावरून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष (शरद पवार गट) जयंती पाटील यांनी अजित पवारांना घेरण्याचा प्रयत्न केला आहे. या वक्तव्यावरून “अजित पवार हे नेहमीच खरे आणि सत्य बोलतात. त्यामुळे अजित पवार यांची ही भूमिका निवडणूक आयोगाने लक्षात घ्यावी,’ अशी मागणी केली आहे. पाटील एका कार्यक्रमानंतर शनिवारी पुण्यात पत्रकारांशी बोलत होते.

काही महिन्यांपूर्वी शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे यांना देण्याच्या निर्णयावेळी अजित पवार विरोधी पक्षनेते होते. त्यावेळी त्यांनी आपली भूमिका मांडली होती. त्यात “काही आमदार एका बाजूला गेले आणि त्यांनी म्हटले होते, की पक्ष आमचा तर त्यांना पक्ष किंवा चिन्ह देणे योग्य आहे का? मनसेचा एक सदस्य गेला, तर मनसे पक्ष त्याच्यासोबत जाईल का?’ असे विधान अजित पवार यांनी केले होते. त्यामुळे या सुनावणीत पवार यांना याच वक्तव्यावरून राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून घेरले जाण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे.

पाटील म्हणाले, “राष्ट्रवादी आमची असल्याची दावा झाल्यानंतर पक्षात फूट पडलेली नाही. त्यामुळे आमची बाजू आधी ऐकावी नंतर सुनावणी घ्यावी, अशी मागणी आम्ही केली होती. मात्र, आम्हला संधी न देता थेट सुनावणी ठेवली आहे. त्याबाबत वेगवेगळे मतप्रवाह मांडले जात असले तरी आमचे वकील आमची बाजू मांडतील. पण आयोगाने हा व्हिडिओ पण लक्षात घ्यावा. भारताच्या इतिहासात जे संस्थापक आहेत तेच पक्षाचे अध्यक्ष आहेत, त्यांना बाजूला करतात, त्याची वाच्यता होत नाही. राजकीय पक्ष पळविण्याची व चोरण्याची पद्धत सुरू झाली आहे. निवडणूक आयोग सुजान आहे. ते योग्य निर्णय घेतील.’