सोनिया गांधींसोबतचा ठाकरेंचा फोटो शेअर केला, भाजपचे नितेश राणेंनी शिवसेनेला डिवचले

मुंबई, १९/०७/२०२२ – शिवसेनेच्या खासदारांमधील गट बंडखोर एकनाथ शिंदे गटासोबत जाणार असल्यामुळे राज्यातील राजकारणात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. त्यातच खासदास संजय राऊत आणि भाजपा आमदार नितेश राणे आमने-सामने आले आहेत.

राऊत यांनी केलेल्या दाव्यावरुन नितेश राणेंनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंना जुळी भावंडे आहेत का असा खोचक प्रश्न ट्वीटरवरुन विचारला आहे. शिवसेनेचे १२ बंडखोर खासदार शिंदे गटातील बैठकीत सहभागी झाल्याचे कळताच सोमवारी संध्याकाळी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिल्लीतील निवासस्थानी शिवसेनेच्या खासदारांची बैठक बोलावली. यावेळी बैठकीला लोकसभेतील शिवसेनेचे गटनेते विनायक राऊत, अरिवद सावंत, संजय जाधव, ओमराजे निंबाळकर, राजन विचारे आणि राज्यसभेतील खासदार अनिल देसाई, प्रियंका चतुर्वेदी उपस्थित होत्या. लोकसभेतील खासदार गजाजन कीर्तीकर दिल्लीत आलेले नाहीत. त्यामुळे शिवसेनेचे लोकसभेतील पाच खासदारांनी बैठकीला हजेरी लावली. अन्य १२ खासदार गैरहजर राहिल्याने शिवसेनेमध्ये राष्ट्रीय स्तरावर फूट पडल्याचे स्पष्ट झाले.

दरम्यान, नितेश राणे यांनी संजय राऊत यांना २०२० मध्ये उद्धव ठाकरे आणि त्यांचे आमदारपुत्र आदित्य ठाकरे हे दिल्लीत काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना भेटण्यासाठी आले होते अशी आठवण करुन दिली. ट्वीट करत नितेश राणेंनी राऊत यांच्या काही स्मरणात राहत नाही असे सूचित करायला त्यांना ‘गजनी’ म्हटले आहे. ‘गजनी’ चित्रपटामध्ये ज्याप्रमाणे प्रमुख अभिनेता गोष्टी विसरतो तसेच संजय राऊत असल्याचं यामधून राणेंना अधोरेखित केले आहे.