पुण्यात राहुल गांधींची सभा होणार

पुणे, २६ एप्रिल २०२४ : पुणे लोकसभा मतदारसंघात प्रचाराची रणधुमाळी सुरू झालेली असताना राष्ट्रीय स्तरावरचे नेते आता शहरात दाखल होत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेनंतर तीन मे रोजी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची पुण्यात सभा किंवा रोडशो होणार आहे. त्यामुळे या निमित्ताने राहुल गांधी यांचे व काँग्रेसचे पुण्यात शक्तिप्रदर्शन होणार आहे.

पुणे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये भाजप विरुद्ध काँग्रेस अशी थेट लढत आहे. वंचित बहुजन आघाडी तर्फे वसंत मोरे आणि एएमआयएमतर्फे अनिस सुंडके हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये असले तरी यंदा निवडणूक दुरंगीच होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे भाजप आणि काँग्रेस तर्फे कार्यकर्त्यांनी प्रचाराची कंबर असलेली आहे. भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची २९ एप्रिल रोजी सायंकाळी सात वाजता रेस कोर्स येथील मैदानावर सभा होणार आहे. त्यासाठी मांडव घालण्याचे व इतर तयारीची कामे सुरू आहेत. त्यातच राहुल गांधी यांची सभा कधी होणार याची प्रतीक्षा काँग्रेस कार्यकर्त्यांना होती.

काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी म्हणाले गुरुवारी रात्री राहुल गांधी यांच्या पुणे दौऱ्याबद्दल कळविण्यात आलेले आहे. सभा किंवा रोडशो यापैकी एक कार्यक्रम पुण्यामध्ये होईल. त्याबाबत अद्याप नियोजन झालेले नाही. राहुल गांधी यांची सभा ठरल्यास ती शिवाजीनगर येथील एसएसपीएमएस च्या मैदानावर सायंकाळी होण्याची शक्यता आहे. देशात राहुल गांधी यांच्या सभांना मोठी गर्दी होत असताना पुण्यामध्ये काय होणार त्याच्याकडे लक्ष लागलेली आहे.