माझ्यामुळे भाजपचा उमेदवार निवडून येत असेल तर माझी माघार; वंचितच्या उमेदवाराची लोकसभा निवडणुकीतून माघार

जळगाव, १९ एप्रिल २०२४ : लोकसभेसाठी मतदारसंघांमध्ये निवडणुकीची रणधुमाळी आहे. १४ एप्रिल रोजी वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी घोषित झाली असल्याची माहिती प्रफुल्ल लोढा यांनी दिली होती. मात्र लोकसभा मतदारसंघात भेटीगाठी सुरू केल्यानंतर मी निवडून येऊ शकत नाही ही वस्तूस्थिती असल्याने मला दिलेली उमेदवारी मागे घेत असल्याची माहिती लोढा यांनी दिली.

वंचित आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्याशी प्रफुल्ल लोढा यांनी दूरध्वनीवरून संपर्क करून सांगितले, की जळगाव लोकसभेतून मी निवडून येऊ शकत नाही. त्यामुळे मी स्वतः कोणताही दबाव नसताना माघार घेत आहे. यावर आंबेडकर यांनी माझे कौतुकच केले त्यांनी सांगितले की उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर तुम्ही माघार घेतलेली नाही, त्यामुळे तुम्ही मला धोका सुद्धा दिलेला नाही असेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी प्रफुल्ल लोढा यांनी सांगितले, की मी कोणत्याही दबावाला बळी न पडता माझी ही माघार आहे. मी मतदार संघामध्ये फिरलो असता माझ्यामुळे भाजपाचा उमेदवार निवडून येत असेल तर मी माघार घेतलेली कधीही चांगली. याबाबत मी प्रकाश आंबेडकर यांना संपूर्ण माहिती दिलेली आहे. त्यामुळे मी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेत आहे.

येणाऱ्या दोन दिवसात मी माझा निर्णय जाहीर करणार आहे. कोणत्या उमेदवाराला अथवा कोणत्या पक्षाला मी पाठिंबा द्यावा हे दोन दिवसात जाहीर करणार असल्याची माहिती प्रफुल्ल लोढा यांनी दिली. लोढा यांनी अचानक माघार घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार करण पवार यांना पाठिंबा दर्शविण्यात येणार अशी माहिती असून यामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवारला बळ नक्कीच मिळेल.