सुप्रिया सुळेंवर सुनेत्रा पवारांचे ५५ लाखाचे कर्ज

पुणे, १८ एप्रिल २०२४ : बारामती लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या उमेदवार विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांचे भाचे पार्थ आणि वहिनी सुनेत्रा यांच्याकडून ५५ लाख रुपयांचे कर्ज घेतले आहे. तर, सुनेत्रा पवार यांनी सुप्रिया सुळेंसह पती अजित पवार, सासू आशाताई पवार, प्रतिभा पवार यांना कर्ज दिले आहे.

विद्यमान खासदार सुप्रिया सुळे आणि त्यांचे कुटुंबीय अब्जाधीश असून, सुळे कुटुंबाची एकूण संपत्ती सुमारे १६६ कोटी ५१ लाख ८६ हजार ३४८ रुपयांच्या घरात पोहोचली आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत त्यांच्या उत्पन्नात एक कोटी आठ लाख ९७ हजार ३४८ रुपयांनी भर पडली आहे. सुळे कुटुंबीयांचे वार्षिक उत्पन्न सरासरी ५.६८ कोटी रुपये असूनही त्यांनी आपले बंधू आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा आणि त्यांचा मुलगा पार्थ पवार यांच्याकडून सन २०१९ मध्ये उसने घेतलेले ५५ लाख रुपये पाच वर्षांनंतरही फेडलेले नाहीत. सन २०१४ च्याललोकसभा निवडणुकीत सुळे कुटुंबाच्या नावावर १३३.३६ कोटी रुपयांची मालमत्ता होती. सन २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत सुळे कुटुंबाच्या नावावर १६५ कोटी ४२ लाख ८९ हजार रुपयांची मालमत्ता होती, तर सध्या सुळे कुटुंबाकडे १६६ कोटी ५१ लाख ८६ हजार ३४८ रुपयांची मालमत्ता आहे. सुळे कुटुंबाने पार्थ पवार यांच्याकडून २० लाख रुपये, तर सुनेत्रा पवार यांच्याकडून ३५ लाख रुपये घेतले आहेत.

त्यांच्यावर अन्य कोणत्याही संस्थेचे कर्ज नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. सुळे यांनी सुमारे तीन कोटी ५८ लाख ७७ हजार २३० रुपये विदेशी बँकांमध्ये गुंतविले आहेत. सुळे यांचे पती सदानंद यांनी सुमारे सहा कोटी ५५ लाख १६ हजार ६७३ रुपये विदेशी बँकांमध्ये गुंतविले आहेत.

सुळे यांच्याकडे दोन कोटी ६१ लाखांच्या सोने-चांदी आणि मौल्यवान वस्तू आहेत. सुळे यांच्याकडे बारामतीमधील माळेगाव, ढेकळवाडी येथे शेतजमीन असून पुण्यातील कोरेगाव पार्क येथे सदनिका आहे. दरम्यान, सुनेत्रा पवार आणि त्यांच्या कुटुंबियांकडे १२७ कोटी ५९ लाख ९८
हजार २०५ रुपयांची मालमत्ता आहे. त्यामध्ये सुनेत्रा यांची जंगम मालमत्ता १२ कोटी ५६ लाख ५८ हजार ९८३, तर पती अजित पवार यांची १३ कोटी २५ लाख सहा हजार ३३ रुपये, तर इतर कुटुंबाच्या नावे तीन कोटी ८३ लाख ६४ हजार ७९७ रुपयांची आहे. सुनेत्रा यांना वारसा हक्काने ३३ कोटी नऊ लाख ९९ हजार ६४९ रुपये, तर पती अजित यांना ७५ लाख चार हजार १८० रुपयांची मालमत्ता मिळाली आहे. सुनेत्रा यांनी छत्रपती संभाजीनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून वाणिज्य शाखेची पदवी घेतली आहे. सुनेत्रा यांच्यावर १२ कोटी ११ लाख १२ हजार ३७४ रुपयांचे, तर पती अजित पवारांवर चार कोटी ७४ लाख ३१ हजार २३९ रुपयांचे कर्ज आहे. सुनेत्रा यांच्याकडे तीन लाख ९६ हजार ४५० रुपयांची रोख रक्कम, तर पती अजित पवारांकडे तीन लाख १२ हजार १३० रुपयांची रोख रक्कम आहे. सुनेत्रा यांच्या नावे ट्रॅक्टर, ट्रेलर, तर पती अजित पवारांच्या नावे दोन ट्रेलर, टोयोटा, होंडा सीआरव्ही या चारचाकी आहेत.

सुनेत्रा यांच्याकडे बारामतीमधील सोनगाव, ढेकळवाडी, वंजारवाडी, जळोची, गोडांबेवाडी येथे शेतजमीन, तर पुण्यातील कल्याणी नगर येथे झिरोजी अपार्टमेंट, पुण्यातील सिंध सोसायटी, बिबवेवाडीतील सोबा सवेरा आणिनवरळीतील शुभदा अपार्टमेंट येथे सदनिका आहेत.

सुनेत्रा पवारांकडून कुटुंबियांना कर्ज

सुनेत्रा यांनी अजित पवार यांच्या मातोश्री म्हणजेच सासूबाईंना ८२ लाख ८१ हजार ८७८ रुपये, अजित पवार यांना ६३ लाख २० हजार ३०३ रुपये, शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांना ५० लाख रुपये, तर सुप्रिया सुळे यांना ३५ लाख रुपयांचे कर्ज दिल्याचे त्यांच्या प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले आहे.