मी पुण्याचा खासदारही नाही आणि पालकमंत्री पण होणार नाही: देवेंद्र फडणवीस

पुणे, ०२/०९/२०२२: गेले काही दिवसापासून पुण्याचा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस होणार या चर्चेला उधाण आले होते. तर 2024ला भाजपचा उमेदवार फडणवीसच असणार याही चर्चेने जोर पकडलेला होता. फडणवीस पुण्याचे खासदार होणार म्हणून स्थानिक इच्छुकांच्या पोटात गोळा आला होता. मात्र आता यावर फडणवीस यांनी स्पष्टीकरण देत मी पुण्याचा पालकमंत्री ही होणार नाही आणि खासदार देखील होणार नाही असे स्पष्ट करत या चर्चेवर पडदा टाकला.

 

पुण्यात गणेशोत्सवाची धामधूम सुरू असताना शासकीय व खासगी कार्यक्रमांसाठी देवेंद्र फडणवीस पुण्यात आलेले आहेत. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

 

तुम्ही पुण्याचे पालकमंत्री आणि खासदार होणार का याबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला असता फडणवीस यांनी स्पष्ट नकार दिला. फडणवीस म्हणाले, “मी पुण्याचा पालकमंत्री होणार नाही आणि खासदार देखील होणार नाही या केवळ माध्यमांमध्ये रंगलेल्या चर्चा आहेत. मी खासदार होऊन तुम्हाला महाराष्ट्रामध्ये नको का असा प्रति प्रश्नही त्यांनी माध्यमांना केला.

 

मंत्रिमंडळ विस्तारा बाबत फडणवीस म्हणाले, लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाईल. त्याचवेळी मात्र काँग्रेसमधील नेत्यांना मंत्रिमंडळ स्थान देणार का या प्रश्नावर फडणवीस यांनी मौन बाळगले.