पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांची डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाला भेट

पुणे, ३० सप्टेंबर २०२२: राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी डी.सी.एम.सोसायटी ऑफ इंडियाच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाला भेट दिली. त्यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ग्रंथालयाचीदेखील पाहणी केली.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष डी.टी. राजपूत, सरचिटणीस विशाल शेवळे, प्राचार्य डॉ.नरेश पोते आदी उपस्थित होते.

डी.सी.एम.सोसायटी ही संस्था वंचितांना शिक्षण मिळावे यासाठी चांगले कार्य करीत आहे. संस्थेला कौशल्य विकास अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी, तसेच इतरही शैक्षणिक उपक्रमांसाठी सहकार्य करण्यात येईल, असे यावेळी मंत्री पाटील यांनी सांगितले.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेला भेट
पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेतला भेट दिली. त्यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थिनींना पुरस्कार प्रदान करण्यात आले.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष रवींद्र देव, उपकार्याध्यक्षा डॉ. विद्या कुलकर्णी, सचिव डॉ. पी. व्ही. एस. शास्त्री, संस्थेच्या मुलींच्या कमिन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरींगच्या प्राचार्या डॉ. माधुरी खांबिर्डे, संस्थेचे पदाधिकारी, प्राध्यापक, विद्यार्थीनी आदी उपस्थित होते.

समाजासाठी वेगवेगळ्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या संस्थेच्या विद्यार्थीनींचे आणि संस्थेचे अभिनंदन करुन मंत्री पाटील म्हणाले, शैक्षणिक क्षेत्रात मुलींनी चांगली प्रगती केली आहे. मुलींच्या शिक्षणाचे अग्रणी, संस्थापक म्हणून महर्षी कर्वेंनी काम केले. महिला मोठ्या प्रमाणात सर्व क्षेत्रात पुढे यायला लागल्या आहेत, असे ते म्हणाले.

श्री. पाटील म्हणाले, आगामी काळात मुलींना प्रोत्साहन देण्याची आवश्यकता असून हे कार्य कर्वे शिक्षण संस्था करीत आहे. संस्थेच्या तुकड्या वाढवणे, एखादी विद्याशाखा वाढवणे यासाठी सहकार्य करण्यात येईल, असेही ते म्हणाले. कौशल्य विकासाला आगामी काळात पर्याय नाही. त्यामुळे कौशल्य विकासासाठी एखादा विभाग सुरू करण्यासाठी संस्थेने विचार करावा, अशी सूचनाही श्री. पाटील यांनी केली.