थोरात आणि नाना पटोले यांच्यात शीतयुद्धवर १३ फेब्रुवारीला चर्चा
पुणे, ६ फेब्रुवारी २०२३ : नाशिक पदवीधर मतदार संघात अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे हे विजयी झाले आहेत. निकालानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन काँग्रेस, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी केलेल्या आरोपावरुन गेल्या दोन दिवसापासून राज्यातील राजकारण तापलं आहे. यामुळे काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.या प्रकरणावर चर्चा करण्यासाठी १३ फेब्रूवारीला प्रदेश कार्यकारिणीची बैठक बोलावण्यात आली आहे, असे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केले.
राज्यभरात नाना पटोलेंविरोधात काँग्रेसमधील काही नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. अनेकांनी त्यांच्याविरोधात तक्रारी पक्षश्रेष्ठींकडे करणार असल्याचे सांगितले.या पार्श्वभूमीवर पटोले यांचे प्रदेशाध्यक्ष पद धोक्यात येऊ शकते, अशी शक्यता निर्माण झाली असल्याचे राजकीय विश्लेषकांचे म्हणणं आहे. पटोलेंचे आता पुढे काय होणार, याची उत्सुकता वाढू लागली आहे.
तांबेच्या आरोपानंतर काँग्रेसचे नेते, बाळासाहेब थोरात आणि नाना पटोले यांच्यात शीतयुद्ध सुरु झाले आहे. माध्यमांसमोर बोलताना दोघांनीही एकमेकांवर टीका केली आहे.
दोघांतील वाद विकोपाला गेला आहे. राज्यातील काँग्रेसमधील अंतर्गत वाद पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहचला आहे. नाना पटोले यांच्यासोबत काम करणं अशक्य आहे, असे विधान बाळासाहेब थोरात यांनी केला आहे. याबाबत त्यांनी पक्षश्रेष्ठींना पत्र लिहिल्याचे त्यांनी सांगितले आहे.
याबाबत नाना पटोलेंना विचारल्या असता ते म्हणाले, “बाळासाहेब थोरात हे आमचे नेते आहेत. त्यांनी काय पत्र लिहिलंय हे मला माहिती नाही.नाशिक पदवीधर मतदार संघातील या प्रकरणावर चर्चा करण्यासाठी १३ फेब्रूवारीला प्रदेश कार्यकारिणीची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत योग्य चर्चा करून घरातला प्रश्न हा घरात सोडवू,” “थोरातांनी असं कुठलंही पत्र लिहिलं नसेल,” असे पटोले यांनी माध्यमांना सांगितले. पटोलेंनी भाजपवर जोरदार टीका केली आहे.
नाशिक पदवीधर मतदार संघात झालेल्या राजकारणावरुन पटोलेंनी भाजपवर टीका केली आहे. “भाजपने जे खड्डे खोदलेत त्याचे परिणाम आता त्यांना भोगावे लागतील” अशा शब्दात नाना पटोले यांनी भाजप नेत्यांना इशारा दिला आहे.
काय म्हणाले होते बाळासाहेब थोरात
विधान परिषदेच्या निवडणुकीवेळी मोठं राजकारण झालं. सत्यजीत या निवडणूक चांगल्या मतांनी विजयी झाले. मी त्यांचं अभिनंदन करतो. मात्र, जे राजकारण झालं, ते व्यथित करणारं होतं. मी याबाबत माझी भूमिका पक्षश्रेष्ठींकडे मांडली आहे. हे पक्षीय राजकारण आहे. त्यामुळे यावर बाहेर बोललं पाहिजे, या मताचा मी नाही. याबाबत पक्षातील नेत्यांबाबत बोलणं झालं असून योग्य तो निर्णय होईल.
विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप