महापालिका निवडणूक स्वबळावर लढवणार : राज ठाकरे

कोल्हापूर, ३० नोव्हेंबर २०२२: ‘बालेकिल्ला हा काही नेहमीच अभेद्य राहत नाही. कधी ना कधी तो भेदला जातोच. अनेक ठिकाणी प्रस्थापितांविरोधात काही पक्षांना यश मिळाले आहे. आमचाही लढा त्यासाठीच राहील,’ असे सांगतानाच, ‘मुंबई महापालिका निवडणूक स्वतंत्रपणे लढणार आहोत,’ अशी माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे
अध्यक्ष राज ठाकरे यांनी कोल्हापुरात राज ठाकरे पत्रकार परिषदेत दिली.

विविध निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोकण दौऱ्यावर जाताना कोल्हापुरात त्यांनी पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतला. या वेळी त्यांचे स्वागत करण्यात आले.

त्यानंतर पत्रकारांशी बोलताना राज ठाकरे म्हणाले, ‘पश्चिम महाराष्ट्र हा काँग्रेसचा, मुंबई शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो. पण कधी ना कधी येथेही विरोधक निवडून आलेच ना? म्हणून बालेकिल्ल्याला धडक मारण्यासाठी मी आता पश्चिम महाराष्ट्र दौरा करणार आहे.”मी कधी भाजपसाठी तर कधी महाविकास आघाडीसाठी काम करतो, असा आरोप होतो. पण तसे काहीच नाही. मी जे काम करतो, ते केवळ पक्षासाठी, माझ्यासाठी आणि महाराष्ट्रासाठी,’ असे राज ठाकरे म्हणाले.

‘प्रकृतीची नव्हे, परिस्थितीची चेष्टा’ माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही राज यांनी टीका केली. ‘पदावर असताना विविध कारणे पुढे करून, ते जनतेपासून दूर राहिले. आताच त्यांना जनता कशी आठवते,’ असा सवाल करून राज ठाकरे म्हणाले, ‘ती प्रकृतीची चेष्टा नव्हती, तर परिस्थितीची चेष्टा होती.’