Plan constituency wise to effectively convey the role of the party to the people - BJP state president Chandrasekhar Bawankule

पक्षाची भूमिका जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी मतदारसंघ निहाय नियोजन करा – भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई, ०८/०१/२०२४: आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघांमध्ये केंद्र व राज्य सरकारची कामगीरी पोहोचवण्यासाठी विविध माध्यमांचा प्रभावीपणे वापर करा, त्यासाठी टीम तयार करा असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी केले. प्रदेश भाजपातर्फे झालेल्या प्रवक्ते व प्रसिद्धी प्रमुखांच्या बैठकीच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, प्रदेश माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन, सहमुख्य प्रवक्ते विश्वास पाठक, अजित चव्हाण उपस्थित होते.

 

बावनकुळे यांनी सांगितले की, आगामी काळात मीडिया, सोशल मीडिया, डिजिटल मीडिया यासाठी संघटना स्तरावर स्वतंत्र नियुक्त्या केल्या जातील. पक्षवाढीसाठी समर्पित वेळ देणा-या विविध क्षेत्रातील नामांकित व्यक्तिंचे सहकार्य घेऊन त्यांच्या मार्फत पक्षाची वाढ जिथे म्हणावी तशी झालेली नाही अशा ठिकाणी पक्षाची भूमिका पोहोचवण्याचा प्रयत्न माध्यम विभागाने करावा.

 

पक्षाविषयी चांगली मते असणाऱ्या निवृत्त पत्रकार, लेखक, विचारवंत अशा लोकांना एकत्र आणत विशेष उपक्रम राबवावे तसेच मतदारसंघ निहाय महत्वाचे विषय हाती घेऊन प्रवक्त्यांनी विविध माध्यमांतून व्यक्त व्हावे, पक्षाचा जनाधार वाढवण्यासाठी वेगवेगळ्या मार्गांचा वापर करावा असे आवाहनही बावनकुळे यांनी केले.

 

दिवसभर झालेल्या या बैठकीत प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी, राष्ट्रीय प्रवक्ते प्रेम शुक्ला, प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, सह मुख्य प्रवक्ते विश्वास पाठक यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले. 6 डिसेंबर 1992 रोजी बाबरी मशिदीचा ढाचा पाडतानाचे छायाचित्र कॅमे-यात टिपणारे ज्येष्ठ कॅमेरामन व पक्ष प्रवक्ते मोहन बने यांचा यावेळी श्री. बावनकुळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.