बिनविरोध निवडणुकीसाठी जगदीश मुळीक यांचा इमोशनल गेम

पुणे, ३१ जानेवारी २०२३ : कसबा विधानसभा निवडणुकीची पोटनिवडणूक बिनविरोध होणार नसल्याचे स्पष्ट झाले असताना भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी इमोशनल खेळ सुरू केला आहे. सर्व पक्षांच्या नेत्यांना पत्र पाठवून ही निवडणूक बिनविरोध करा हीच मुक्ता टिळक यांना खरी आदरांजली ठरेल असे आवाहन केले आहे. त्यामुळे आता विरोधी पक्षांकडून याला काय उत्तर मिळणार याकडे लक्ष लागले आहे.
आमदार मुक्ता टिळक यांचे निधन झाल्याने कसबा विधानसभेची निवडणूक जाहीर झाली आहे. आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून सात तारीख हे पर्यंत ही मुदत आहे. दरम्यान या निवडणुकीसाठी भाजपकडून टिळक कुटुंबात उमेदवारी द्यायची की अन्य कार्यकर्त्याला संधी द्यायची याचा निर्णय अद्याप होऊ शकलेला नाही. प्रदेश भाजपकडे पाच इच्छुकांची नावे पाठविण्यात आले असून त्यावर केंद्रीय निवड समिती निर्णय घेणार आहे. तर दुसरीकडे शिवसेना, काँग्रेस या महाविकास आघाडीच्या पक्षांनी ही निवडणूक तयारी सुरू केलेली आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक होणार असून त्यामध्ये निवडणुकीची भूमिका निश्चित होणार आहे. एकंदरीतच कसबा विधानसभा निवडणूक ही बिनविरोध होणार असल्याचे स्पष्ट झालेले असताना आज शहराध्यक्ष मुळीक यांचे एक पत्र व्हायरल झालेले आहे. त्यामध्ये त्यांनी सर्व पक्षाच्या नेत्यांना ही निवडणूक बिनरोध करा असे आवाहन केले आहे.

असे आहे मुळीक यांनी लिहिलेले पत्र.

प्रति
मा.

सप्रेम नमस्कार,

कसबा विधानसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय आमदार मुक्ताताई टिळक यांच्या दुःखद निधनाने कसबा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे.

भारतीय स्वातंत्र्याचे अग्रेसर नेते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा राजकीय वारसा मुक्ताताई समर्थपणे पुढे चालवत होत्या. देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणारे लढवय्या, निर्भिड नेते अशी लोकमान्य टिळकांची ओळख होती.

मुक्ताताईंनी सर्व समाज घटकांना बरोबर घेत गेली वीस वर्षे पुणे शहरात विकासाचे कार्य केले. त्यांचे सर्वच राजकीय पक्षातील नेत्यांशी अतिशय सौहार्दपूर्ण संबंध होते. अजातशत्रू व्यक्तिमत्व अशी त्यांनी ओळख निर्माण केली होती.

महाराष्ट्राची अशी वैशिष्ट्यपूर्ण राजकीय संस्कृती आहे. सर्वच राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आपला पक्षानिवेश बाजूला ठेवून परस्परांशी उत्तम संबंध प्रस्थापित करतात. विकासकामात कधीच राजकारण येऊ देत नाहीत. तसेच निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर सर्वानुमते बिनविरोध निवडणूक केली जाते.

आपल्या राज्याची ही वैभवशाली परंपरा कायम ठेवण्यासाठी भारतीय जनता पार्टीने नेहमीच सकारात्मक भूमिका घेतली. याच भूमिकेतून नुकतेच अंधेरी विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजप आणि मित्र पक्षांनी शिवसेनेच्या विरोधात उमेदवार दिला नाही. राज्यसभेचे काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांच्या निधनानंतर जाहीर झालेल्या राज्यसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपने विरोधकांच्या विनंतीला मान देत उमेदवार न देता बिनविरोध निवडणूक केली होती.

त्याच प्रकारे पुणे शहरातील कसबा विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी, अशी विनंती मी सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांना करीत आहे. मुक्ताताईंना तीच खरी आदरांजली ठरेल.

धन्यवाद!

आपले स्नेहांकित,